अमरावती : कोरोना व म्युकरमायकोसिस उपचार सुविधांच्या दर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून निश्चित दर यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहेत. गरजूंकडून रुग्णालयांनी अवाजवी दर आकारू नयेत, यासाठी खासगी रुग्णालयातील देयकांचे ऑडिट करण्यासाठी तीन रुग्णालयांमागे एक लेखाधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी दिली.
कोविड साथीच्या काळात गरजू रुग्णांची आर्थिक पिळवणूक, औषधांचा काळाबाजार व अपप्रकार घडू नये, यासाठी तपासणीचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी वेळोवेळी दिले आहेत. त्यानुसार तपासणी पथकेही नेमण्यात आली. आता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून खासगी रुग्णालयातील देयकांचे ऑडिट करण्यात येणार आहे.
यासाठी उपजिल्हाधिकारी राम लंके यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी १७ लेखाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नितीन मेश्राम, जयश्री कोंडे, बी. डी. कऱ्हाड, सुनील पाराशर, एस. बी. शहा, सतीश वाघ, एस. डी. पटोरकर, क्रांती गावंडे, उमेश लामकाने, अमित रामेकर, संदीप साळवे, संजय सिन्हा, लक्ष्मण राठोड, संजय खासबागे, अमोल गोफण, मनीष गिरी व सदानंद जांत्रळे यांचा समावेश आहे.