घाटलाडकी सेंट्रल बँक : शेतकरी महिलेची जिल्हाधिकाऱ्यांकडे धावचांदूरबाजार : घाटलाडकी येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत दोन बहीण-भाऊ शेतकऱ्यांनी त्यांचे २ लाख ९० हजार रूपये ‘विल्ड्रॉल’ केले म्हणून शाखा व्यवस्थापकांनी त्यांचे बँकेतील खातेच बंद करून टाकले. परिणामी त्या खात्यावरील शेती नुकसानीचे अनुदान व घरकुलाची रकमही परत गेल्याचा आरोप घाटलाडकी येथील शेतकरी शहजाद अलीम शेख इब्राहीम व त्यांची बहिण रिजवानाबानो शेख इब्राहीम यांनी केला. शाखा व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली.घाटलाडकी सेंट्रल बँकेच्या शाखेत शहजाद अलीम शेख या शेतकऱ्याचे खाते क्रमांक ३१७४५२७९३५ या खात्यात १ लाख ६० हजार तर त्याची बहीण रिजवानाबानो या शेतकरी महिलेच्या खाते क्र. ३६३१५१४४८२ या खात्यात १ लाख ३० हजार रूपये जमा होते. यांनी शेताचा सौदा केला त्याचा इसार देण्यासाठी या खातेदारांनी बँकेकडे या जमा रकमेची मागणी केली मात्र शाखा व्यवस्थापकाने त्यांचीच रकम त्यांना २ एप्रिलपूर्वी देण्यास टाळाटाळ केली. इतकेच नव्हे तर या शाखा व्यवस्थापकाने या दोघांनाही उद्धट वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही रक्कम वेळेत काढल्या गेली नाही तर या खातेदारांनी शेती खरेदी केलेल्या इसाराची एक लाखाची रकम बुडणार होती. त्यामुळे यांनी शाखा व्यवस्थापकाकडे पैसे देण्याचा आग्रह धरला. त्यानंतर मात्र शाखा व्यवस्थापकांनी या खातेदारांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांची कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेऊन ही दोन्ही खाती बंद करून खात्यावरची रक्कम त्यांना दिली. खाते बंद झाल्यामुळे या खात्यावर आलेले शेती अनुदान व घरकुलाची रकमेपासून सदर खातेदार वंचित राहिल्याचा आरोप या भाऊ-बहीण शेतकऱ्यांनी केला असून गरीब शेतकऱ्यांना छळणाऱ्या अशा शाखा व्यवस्थापकावर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. निवेदनाची दखल घेतल्या गेली नाही तर आत्महत्या करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
३१ मार्चपूर्वी पैसे काढल्यामुळे खातेच बंद
By admin | Published: April 02, 2015 12:36 AM