अमरावती : शेजारी राहणाऱ्या एका इसमाला लोखंडी घण मारून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला न्यायालयाने तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. संतोष गुणवंतराव हरमकर (४२ रा. कांडलकर प्लॉट, अमरावती) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक २) व्ही.एस. गायके यांच्या न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला. ही घटना २२ मे २०१५ रोजी खोलापुरी गेट हद्दीतील कांडलकर प्लॉट परिसरात घडली होती.
रणजितसिंग ठाकूर व आरोपी संतोष हरमकर हे एकमेकांच्या शेजारी राहत होते. रणजित ठाकूर यांचा भाऊ संजयसिंह ठाकूर हा पत्नीकडे वाईट नजरेने पाहत असल्याचा संशय आरोपी संतोषला होता. या कारणावरून २२ मे २०१५ रोजी आरोपी संतोष हरमकर याने सायकल धूत असलेल्या संजयसिंग ठाकूरवर लोखंडी घणाने हल्ला केला. दरम्यान रणजित ठाकूर हा संजयसिंगला वाचविण्यासाठी गेला. त्याचवेळी संतोषने संजयसिंगसह रणजितसिंहवर घणाने वार केला. त्यानंतर आरोपी संतोष हा तेथून पळून गेला. या हल्ल्यात संजयसिंगला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या घटनेची तक्रार रणजितसिंह ठाकूर यांनी खोलापुरी गेट पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ३२४, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.
बॉक्स
अशी आहे शिक्षेची तरतूद
खोलापुरी गेट पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून २० जून २०१५ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या अनुषंगाने सरकारी अभियोक्ता रणजित भेटाळू यांनी आठ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने भादंविच्या कलम ३०७ अंतर्गत आरोपीला दोषी न ठरवता भादंविच्या कलम ३२६ अंतर्गत दोषी ठरविले. त्यानुसार न्यायालयाने आरोपी संतोष हरमकरला भादंविच्या कलम ३२६ प्रमाणे तीन वर्षांचा साधा कारावास, १ हजारांचा दंड व दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास तसेच भादंविच्या कलम ३२४ प्रमाणे एक वर्षांचा साधा कारावास व १ हजारांचा दंड व दंड न भरल्यास १ महिन्याचा साधा कारावास आणि कलम ५०६ प्रमाणे सहा महिन्यांचा साधा कारावास व १ हजाराचा दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.