चांदूर बाजार - तालुक्यातील कुरळपूर्णा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याला तसेच त्याने सोबत नेलेल्या त्याच्या पत्नीला पुणे येथील पिंपरी-चिंचवड परिसरातून चांदूर बाजार पोलीस ठाण्यात १७ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजता आणण्यात आले. त्याला न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील कुरळपूर्णा येथे प्रेमदिनी दुहेरी हत्याकांड घटले. आरोपी रवि पर्वतकर याने काडीमोड झालेल्या पत्नीचा पिच्छा पुरवत गाव गाठल्यानंतर त्याच्यापाठोपाठ आलेल्या सासरा व मेहुण्याची हत्या केली व त्यानंतर पत्नीला घेऊन पुणे येथे फरार झाला होता. पुणे पोलिसांनी सर्व न्यायालयीन कायदेशीर बाबी पूर्ण होताच, आरोपी व पत्नीला चांदूर बाजार पोलिसांच्या ताब्यात १७ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजता दिले. या घटनेतील वापरण्यात आलेले शस्त्र व दुचाकी अद्यापही पोलिसांना गवसले नाही. याकरिता पोलिसांनी न्यायालयात पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
गुन्ह्याचा तपास ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अब्दागिरे, ठाणेदार सुनील किनगे व सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे करीत आहेत.
--------------
माहेरी जाण्यास नकार
अपहरण केलेल्या रविच्या पत्नीला पोलिसांनी विचारणा केली असता, तिने माहेरी जाण्यास नकार दिला. मला सासरी जाऊन कायमचे राहायचे आहे. अशी माहिती तिने पोलिसांनी दिली.
------------
साक्षीदार म्हणून सादर करणार
आरोपी रवि ही सोबत घेऊन गेलेल्या त्याच्या पत्नीला पोलीस साक्षीदार म्हणून सादर करणार आहेत. फिर्यादी व तिची आई यांचा तक्रारीवरून पोलिसांनी हत्या, हत्येचा प्रयत्न व अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सदर युवतीला पोलिसांनी विचारणा केली असता, तिने माहेरी जाण्यास नकार दिला. यामुळे युवतीचे अपहरण झाले की नाही. असा संशय निर्माण झाला आहे.
---