अमरावती : गाडी चालू करके देता अशी बतावणी करून एका निवृत्त व्यक्तीच्या बोटातील आठ ग्रॅमची सोन्याची अंगठी हिसकावण्यात आली. आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. येथील प्रबोधिनी रस्त्यावर ११ जून रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी नंदकुमार रामभाऊ गेडाम (६५, तपोवन रोड) यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी २६ जून रोजी सायंकाळी आरोपी विक्की उर्फ अमित अशोक यादव (३९, रा. सार्वजनिक बांधकाम विभागामागे) याच्याविरूध्द जबरी चोरी तथा जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला.
नंदकुमार गेडाम हे ११ जून रोजी सायंकाळी विशेष प्रकल्प विभाग कार्यालयात सहकाऱ्याला भेटण्याकरीता दुचाकीने गेले होते. त्यांना भेटून ते दुचाकीने प्रबोधिनी रोडवरील पंतप्रधान ग्रामसडक कार्यालयासमोरील गेटबाहेर निघाले असता काही अंतरावर त्यांची दुचाकी बंद पडली. त्यावेळी आरोपी हा तेथे आला. त्यावेळी रात्रीचे ९.१५ वाजले होते. ‘क्यु क्या हुआ तुम्हारी गाडी बंद पड गई क्या? अशी विचारणा आरोपीने केली. त्यावर मै तुम्हारी गाडी चालु करके देता, असे म्हणून तो गेडाम यांच्याजवळ आला. त्याने त्यांच्या उजव्या हाताच्या बोटात असलेली ८ ग्रॅम सोन्याची अंगठी जबरदस्तीने हिसकावून घेतली.
ते प्रचंड घाबरले
आरोपीने त्याची अंगठी हिसकावत पळ काढण्यापूर्वी पोलीस तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्या धमकीमुळे सेवानिवृत्त गेडाम हे खुप घाबरले. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार कुणालाच सांगितला नाही. आरोपी हा ओळखीतला असल्याने तो यानंतर काही करू शकतो, या भीतीपोटी धाडस करून त्यांनी तो प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर सोमवारी दुपारी फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपी विक्की यादवला तातडीने अटक केली.