परतवाडा : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुष्ठा खुर्द येथे शनिवारी रात्री चारित्र्यावर संशय घेत पत्नीची निर्दयतेने हत्या करणाऱ्या पतीला अचलपूर न्यायालयात सोमवारी हजर करण्यात आले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दोन महिन्यांपूर्वी अमरावती येथील विवाहित महिलेशी प्रेम विवाह करणाऱ्या कुष्ठा खुर्द येथील राहुल गौतम गायकवाड याने शनिवारी पत्नी प्रियावर अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून बांबूच्या काठीने मारहाण केली. अगोदर घराबाहेर व नंतर घरात मारहाण केल्याने त्यात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून अटक केली. ठाणेदार सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी व सहकारी तपास करीत आहेत.
बॉक्स
अत्यंत क्रूरतेने केली मारहाण
मजुरीचे काम करणारा आरोपी राहुल गायकवाड याने पत्नी प्रीती ऊर्फ प्रिया हिला बांबूच्या काठीने अत्यंत क्रूरतेने व निर्दय मारहाण केली. डोक्यापासून तर शरीरातील प्रत्येक भागावर गंभीर जखमांचे निशान शवविच्छेदनादरम्यान आढळून आले आहे. प्रीतीला जाळून मारण्याचा त्याचा इरादा होता का, हे पोलीस तपासात आता पुढे येणार आहे.
बॉक्स
कशी झाली ओळख, राजापेठला हरवल्याची तक्रार?
प्रीती मंगेश राऊळकर असे मृत महिलेचे पूर्वीचे नाव आहे. ती अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील दस्तुर नगर केंद्रात आशा वर्कर म्हणून कार्यरत होती. ती दोन महिन्यांपूर्वी अचानक घर सोडून बेपत्ता झाल्याने तिच्या पतीने राजापेठ पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दिली होती. शोध घेतला असता कुष्ठा येथे आढळून आली. पतीसोबत जाण्यास नकार दिल्याने व बुद्ध विहारात लग्न केल्याचे सांगितल्यामुळे दोन महिन्यांपासून ती दुसरा पती आरोपी राहुल गायकवाड सोबत राहत होती. या दरम्यान तिची ओळख कशी झाली, याचा तपास पोलीस करीत आहेत. प्रीतीच्या मृतदेहाचे अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारी शवविच्छेदन करण्यात आले. पहिला पती व तिच्या आईने अंत्यसंस्कार केले.
कोट
आरोपीला अचलपूर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
राहुल चौधरी, पोलीस उपनिरीक्षक
पो. स्टे. पथ्रोट.