परतवाडा - अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या गतवर्षी करण्यात आलेल्या कर्मचारी भरती प्रकरणात परतवाडा पोलिसांनी सोमवारी सहायक सचिव मंगेश भेटाळू व सहकारी शिपायाविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले. मात्र, फिर्याद दाखल होण्यापूर्वीपासूनच आरोपी पसार झाले आहेत. अटकपूर्व जामिनासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. वर्षभर चर्चेत राहणारी बाजार समिती व सहकार क्षेत्र या प्रकरणाने पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे
विदर्भातील मोठ्या कृषिउत्पन्न बाजार समित्यांपैकी एक अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समिती आहे. कोट्यवधी रुपयांच्या धान्याचा व्यवहार येथे होतो. त्यातूनच बाजार समितीला मोठ्या प्रमाणात सेस मिळतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये गैरप्रकार झाल्याचे अचलपूर पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाले होते. या संपूर्ण घटनाक्रमात तिघांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
बाजार समितीचे सभापती अजय टवलारकर व सचिव पवन सार्वे यांनी १७ डिसेंबर रोजी परतवाडा पोलिसांत तक्रार दाखल करताच आरोपी पसार झाल्याची चर्चा आहे. त्यांना पोलीस केव्हा अटक करतात, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणात मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, राजकीय हस्तक्षेप टाळून पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
बॉक्स
‘एकछत्री राज’ला बसणार का खीळ?
अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीचा आर्थिक व्यवहार पूर्णतः आरोपी सहायक सचिव
मंगेश भेटाळू अनेक वर्षांपासून पाहत आहे. संगणक लिपिकपदावर रोजंदारी कर्मचारी ते सहायक सचिवापर्यंतचा त्याच्या प्रवासाची चर्चा मागील काही दिवसापासून सहकार क्षेत्र व शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. त्याच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी आता होऊ लागली आहे.
बॉक्स
संचालकांमध्ये खळबळ , परिसरात स्मशान शांतता
अचलपुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्मचारी संचालक नात्यागोत्याचा अडकल्याने नात्याने गोत्यात आणल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. सोमवारी गुन्हे दाखल होताच मंगळवारी बाजार समिती परिसरात पूर्णत: स्मशानशांतता दिसून आली. गतवर्षी झालेल्या कर्मचारी भरती प्रकरणात संचालक मंडळाने पुणे येथील के.एन.के. टेक्नॉलॉजी कंपनीला कंत्राट दिला होता. त्यानंतर सुद्धा मुदतीनंतर सहाय्यक सचिवाने शिपायाच्या बहिणीचे परीक्षा शुल्काचा भरणा केला होता. एकंदर सहायक सचिव मंगेश भेटाळूसोबतच या प्रकरणात अजून कोण संचालक सहभागी आहे किंवा कसे, याची तपासणी होणे गरजेचे आहे. एकंदर संचालकांमध्ये या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
000