अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहरा येथील देशी दारू दुकानातील चौकीदारास चाकूचा धाक व मारहाण करून लुटमार करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले. सीसीटीव्ही फुटेज व अन्य कुठलाही पुरावा उपलब्ध नसताना सलग १० तास एकाच ठिकाणी ट्रॅप लावून गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने आरोपीला जेरबंद केले. दुर्णीसिंह दर्णागिरी पवार (३०, रा. तरोडा, बासलापूर ता. चांदूर रेल्वे) असे अटक आरोपीचे नाव आहे, तर त्याचे तीन साथीदार अद्याप पसार आहेत.
३१ ऑक्टोबर रोजी रात्री देशी दारू दुकानाची चौकीदारी करीत असताना चार जण तोंडाला दुपट्टा बांधून आले होते. आपल्याला चाकूचा धाक मारण्याची धमकी दिली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कुलूपकोंडा तोडला. दुकानातील सात देशी दारूच्या पेट्या, फ्रीजमधील बीअर बॉटल व गल्यातील नगदी नऊ हजार रुपये असा एकूण ३५ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला, अशी तक्रार चौकीदाराने केली होती. त्यामुळे चौघांविरूद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी हे प्रकरण गुन्हे शाखा युनिट-२ कडे सोपविले. तपासादरम्यान संशयित आरोपी दुर्णीसिंह पवार याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्याने ती लुटमार गावातीलच इतर तीन साथीदारांसह केल्याचेही सांगितले. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल, इतर साहित्य व दुचाकी असा एकूण ८२ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाईपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील, क्राईम एसीपी शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्र. २ चे पोलीस निरीक्षक राहुल आठवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले, पोलीस अंमलदार राजेंद्र काळे, संजय वानखडे, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, संग्राम भोजने आदींनी केली.