मृत प्रकाश खडसे यांच्या भावाने पोलिसांत दाखल तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३०६ व ३४ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने परतवाडा पोलिसांचे एक पथक २२ एप्रिलला पुण्यात दाखल झाले होते. नीलिमा संजय पीटर आणि संजय एस. पीटर यांना पुणे येथून ताब्यात घेतले. दरम्यान तिसरा मुख्य आरोपी एँथोनी यादव पवार हा पोलिसांच्या हाती लागू शकला नाही. त्याचे लोकेशन घेत पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. पण तो तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. अखेर नीलिमा पीटर व संजय पीटर या दोघांना घेऊन पोलीस २३ एप्रिलला परतवाड्यात दाखल झाले.
या दोन्ही आरोपींना पोलिसांनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी अचलपूर यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या आरोपींना २५ एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
प्रकाश ऊर्फ बाळासाहेब खडसे यांनी त्यांचे मित्र सिरस्कार यांच्या बँक खात्यातून आरोपी एँथोनी यादव पवार याचे बँक खात्यात पाच लाख रुपये पाठविलेत. नंतर एँथोनी पवार याच्या सांगण्यावरून न्यू चाइल्ड नावाच्या संस्थेच्या बँक खात्यात चार लाख व परत एक लाख असे एकूण पाच लाख रुपये आरोपींपर्यंत पोहोचते झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
पसार आरोपी पवार हा सतत आपले राहण्याचे ठिकाण बदलवित असतो. परतवाडा पोलिसांनी नव्याने त्याचे लोकेशन शोधले असून परतवाडा पोलिसांचे एक पथक त्याला पकडण्याकरिता रवाना केले जाणार आहे.