लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एका महिलेला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज व फोटो पाठवून तो फेसबुकवर सार्वजनिक करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी रविवारी अटक केली. हा आरोपी एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात होता, त्याला पोलिसांनी तेथूनच ताब्यात घेतले.
संदीप सुखदेव हजारे (२९, रा. ग्राम अंबवडे, सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संदीपने एका महिलेला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज व फोटो पाठवला. त्यानंतर हा अश्लील फोटो फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. यावेळी संबंधित आरोपीची पोलिसांनी माहिती गोळा केली असता, आरोपी हा गुजरातमधील राजकोट येथे असल्याचे कळल्यावर पथक तेथे रवाना झाले. मात्र, तो हाती लागला नाही. त्यानंतर पोलीस त्याच्या मूळगावी अंबवडे येथेही जाऊन आले. मात्र, तो सापडला नाही. अशातच बारामती पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात तो येरवडा कारागृहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारावर न्यायालयाच्या परवानगीने त्याला तेथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक हरबालाजी एन., अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्र चौबे, वसंत कुरई, प्रमोद खुजे, सुनील बनसोड, संतोष कविटकर, विकास अंजीकर, सागर धापड आदींच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक तपन कोल्हे करत आहेत. या आरोपीविरुद्ध सायबर सेलकडे २०१९मध्ये कलम ६७ माहिती तंत्रज्ञान अधिनियम सहकलम ५०६ भादंविचीनुसार गुन्हा दाखल झाला होता.
बॉक्स
संदीपविरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे
संदीपवर अशाचप्रकारे गिट्टीखदान नागपूर, संगमेश्वर पोलीस ठाणे (जि. रत्नागिरी), बारामती पोलीस ठाणे (जि. पुणे) येथे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी सांगितले.