अमरावती : एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात न्यायालयाने आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. राहुल मनोहर राऊत (२३) असे शिक्षा पात्र आरोपीचे नाव आहे. ही घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ ऑगस्ट २०१५ रोजी घडली होती. १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी कॉलेजमधून घरी पायी जात होती. त्यावेळी आरोपीने तिला पकडून गवतावर पाडले. तिची गच्ची दाबून छेडखानी केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याची तक्रार पीडिताने चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला.
चांदूर रेल्वे ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विजय चन्नोर यांनी गुन्ह्याचा तपास केला. तत्कालीन एपीआय शुभांगी आगाशे यांनी या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शशीकिरण पलोड यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाला. यानुसार अतिरिक्त सह सत्र न्यायाधीश एस.जे.काळे यांनी आरोपीला भादंविच्या कलम ५०६ नुसार पाच वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड तसेच कलम ८ पोक्सो कायद्यान्वये पाच वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्रित भोगावयाच्या आहेत.