अमरावती : मोबाईल घेण्यासाठी लावलेला तगादा सहन न झाल्याने पतीने पत्नीला संपविल्याची घटना आदर्शनगर येथे १२ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते १.३० च्या सुमारास घडली होती. याप्रकरणी मृत पूजा हिच्या आईच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी विजय दादाराव राठोड (२५, रा. पोहरा बंदी, ह.मु. आदर्शनगर) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ४९८ अ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीने मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी विजयने पत्नी पूजा हिच्याशी तब्बल तीनदा लग्न केल्याची माहिती तपासादरम्यान उघड झाली आहे.
मृत मुलीच्या आईने घटनेबाबत १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी तक्रार नोंदविली. आरोपी जावई विजय हा मुलीला मारहाण करायचा, तिच्याशी वाद घालायचा, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तत्पूर्वी, रागाच्या भरात पत्नीला मारहाण केली. त्यात ती दगावल्याचे सांगत विजयने राजापेठ पोलिसांत आत्मसमर्पण केले होते. मात्र, मृताच्या आईने तक्रारीत संशयाचा मुद्दा नमूद केला आहे. आरोपी विजयने ११ महिन्यांपूर्वी पूजाशी विवाह केला. प्रेमसंबंधातून त्याने एकदा मंदिरात, त्यानंतर पळून गेल्यानंतर कोर्ट मॅरेज केले. त्यापुढे जाऊन गावात धूमधडाक्यात वैदिक पद्धतीनेदेखील लग्न केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. शेजाऱ्यांच्या बयानानुसार राठोड दाम्पत्य खूश होते. त्यांच्यात वाद नव्हता. ते गुण्यागोविंदाने राहत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.
कोट
आरोपीने मोबाईल घेण्याच्या वादातून पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली होती. चारित्र्यावर संशय घेऊन आरोपीने आपल्या मुलीला जिवे मारले, अशी तक्रार मृताच्या आईने दिली. तपास वेगाने सुरू आहे.
मनीष ठाकरे, ठाणेदार, राजापेठ