अमरावती : घरफोडीतील आरोपीने अकोला पोलिसांवर रोखलेला देशी कट्टा तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. तर,न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सोमवारी रात्री त्या दोन्ही आरोपींना अकोला पोलिसांनी ताब्यात घेतले. अकोला पोलिसांनी आरोपीच्या वाहनाच्या दिशेने दोन फायर केल्याचा थरार स्वातंत्र्यदिनी येथील लक्ष्मी नगरात घडला होता. त्या फायरवर संशयकल्लोळ उठल्याने परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी दुसऱ्याच दिवशीपासून चौकशी आरंभली आहे.
कारवाई करण्यापूर्वी शहर पोलिसांना पूर्वसूचना का दिली नाही, स्थानिक पोलिसांची मदत का घेतली नाही, आरोपीच्या वाहनाऐवजी तो फायर खालच्या बाजुने का करण्यात आला नाही, आरोपी वाहन चालवत असताना गोळी कारच्या ज्या वरील बाजूने लागली त्यामुळे एन्काउंटर होण्याची शक्यता होती, ती न पडताळता आरोपीच्या दिशेने फायर करायचा होता का, की कसे?, आरोपींनी फायर केला, ही माहिती माध्यमांना कुणी दिली, असे प्रश्न निर्माण झाल्याने डीआयजी चंद्रकिशोर मीना यांनी तातडीने दखल घेत चौकशी आरंभली आहे. त्या फायरबाबत अकोला एसपींसह एलसीबीकडून अहवाल मागितला गेला आहे. गाडगेनगरच्या एसीपी पूनम पाटील या संशयास्पद प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.
सहा दिवसांची पोलीस कोठडी
अकोला पोलिसांनी अमरावतीत येऊन आरोपीवर दोन राऊंड फायर केले. लक्ष्मी नगरात १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास हा थरार घडला होता. याप्रकरणी अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांनी रात्री १०.१८ च्या सुमारास नोंदविलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी राजेश राऊत व पवन काळे (दोघेही रा. अकोला) यांना अटक केली. पीसीआरनंतर दोघांनाही सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेथून त्यांची रवानगी कारागृहात झाली. अकोला पोलिसांनी राऊत व काळे याला कारागृहातून ताब्यात घेतले.
दूध का दूध!
आरोपी राजेश राऊत हा कारबाहेर आला. त्याने आपल्या तथा सहकाऱ्यांवर देशी कट्टा रोखला. तो पिस्टल मधून फायर करण्याच्या सवयीचा असल्याने आपण त्याच्या वाहनाच्या दिशेने दोन राऊंड फायर केले व त्याला ताब्यात घेतल्याचे ढोले यांनी तक्रारीत म्हटले आहे. आरोपीकडून गावठी पिस्टल व दोन काडतूस ताब्यात घेण्यात आले. ते गाडगेनगर पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले. त्यामुळे ते कुणी रोखले, की कसे, हा सर्व घटनाक्रम ठसांवरून उलगडणार आहे.