परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागात वर्ग आठवी, नववी व दहावीचे वर्ग असलेल्या ४२ पैकी १३ शाळाच आज शाळेच्या पहिल्या दिवशी सुरू होऊ शकल्या. यात केवळ १३ शाळांचीच घंटी वाजली. उर्वरित शाळा ठरावा अभावी सुरू होऊ शकल्या नाहीत.मात्र या शाळांमध्ये शिक्षक आपल्या कर्तव्यावर हजर होते. शहरी भागात कुठलीही शाळा १५ जुलैला सुरू झाली नाही.
अचलपूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागात नऊ केंद्रे आहेत. यात भूगाव केंद्रांतर्गत आठवी ते दहावीच्या चार शाळा आहेत. यातील आदर्श विद्यालय भूगाव व संस्कार इंटरनॅशनल स्कूल नारायणपूर ग्रामपंचायत स्तरावरील ठराव नसल्यामुळे सुरू होऊ शकल्या नाहीत. रेणुका माता विद्यालय सुरू झाले, पण एकही विद्यार्थी शाळेत हजर झाला नाही. हरीबाबा विद्यालय बोरगावपेठ येथे १०९ पैकी ४२ विद्यार्थी शाळेत हजर झाले. बोपापूर केंद्रांतर्गत जटांगस्वामी विद्यालयात ५८ पैकी १६ विद्यार्थी शाळेत हजर झाले. समता विद्यालय चमक ठरावाअभावी सुरू होऊ शकले नाही.
मल्हारा केंद्रांतर्गत पाच हायस्कूलपैकी केवळ तीन सुरू होऊ शकले. यात दादासाहेब गवई हायस्कूल मल्हारा येथे २८६ पैकी ६५, मातोश्री लुल्ला हायस्कूल गौरखेडा येथे ३१५ पैकी ३५, तर लेप्रसी कोठारा मिशन अंतर्गत विद्यालयात १३५ पैकी २६ विद्यार्थी शाळेत हजर होते. रासेगाव केंद्र अंतर्गत दोन शाळा आहेत. त्यातील माध्यमिक विद्यालय येवता ही एकमेव शाळा सुरू होऊ शकली. या शाळेत ७७ पैकी २२ विद्यार्थी हजर होते.
परसापूर केंद्रांतर्गत पाच खासगी व एक जिल्हा परिषदचे मिळून सहा शाळा आहेत. या सहाही शाळा पहिल्याच दिवशी उघडल्या. मात्र, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प राहिली. धामणगावगढी केंद्राअंतर्गत आठ खाजगी व पाच जिल्हा परिषदच्या शाळा मिळून एकूण तेरा शाळा आहेत. यातील जिल्हा परिषद निमदरी येथील एकमेव शाळा पहिल्याच दिवशी सुरू होऊ शकली.
कुष्टा केंद्रांतर्गत दोन खाजगी व एक जिल्हा परिषद मिळून तीन शाळा आहेत. यातील कुष्टा येथील दत्तप्रभू हायस्कूल उघडले गेले. या शाळेत १०५ पैकी ६९ विद्यार्थी हजर होते. काकडा येथील जनाबाई नाथे हायस्कूल व जिल्हा परिषदेची उर्दू शाळा सुरू होऊ शकली नाही. पथ्रोट केंद्र अंतर्गत दहा पैकी एकही शाळा उघडली गेली नाही.
असदपूर केंद्रांतर्गत सहा शाळा आहेत. यातील येसुर्णा येथील गाडगेबाबा विद्यालयात ६७ पैकी ४८ विद्यार्थी हजर होते. याच केंद्रांतर्गत सावळापूर येथील राधाकृष्ण विद्यालय सुरू झाले.