खासगी रुग्णालयात बेडकरिता वेटिंग, शेकडो ठिकाणी आढळल्यात डेंग्यू अळ्या, फॉगिंग मशीनचा तुटवडा
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रासह तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात लहान मुलांना डेंग्यूने ग्रासले आहे. खासगी रुग्णालयात त्यांना बेडकरिता प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.
शासकीय आकडेवारीनुसार, अचलपूर शहरात डेंग्यूचे सर्वाधिक संशयित रुग्ण आहेत. अकोला येथील शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालानुसार परतवाड्यात तुलनेने डेंग्यू रुग्णांची संख्या कमी आहे. असे असले तरी दोन्ही शहरांमध्ये डेंग्यूची स्थिती स्फोटक आहे. तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात १६ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आले आहेत. यात चमक येथे सात, नारायणपूर येथे पाच, रासेगाव आणि मल्हारा येथे प्रत्येकी एक डेंग्यू रुग्णाचा अहवाल प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह आला. वाढते डेंग्यू संशयित रुग्ण बघता, संबंधित प्रशासकीय यंत्रणेने सर्वेक्षण सुरू केले आहे. यात अचलपूर नगरपालिका क्षेत्रात ३०४ भांडी (कंटेनर) मध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. ग्रामीण भागात ही डेंग्यू अळी सर्वाधिक सापडली आहे.
----------------
फॉगिंग मशीनच नाही
अचलपूर नगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या बघता कमीत कमी चार फॉगिंग मशीनची गरज असताना नगरपालिकेकडे एकच, तीही बंद पडलेली आहे. धामणगाव गढी व येसुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्राची फॉगिंग मशीन सुरू, पथ्रोट येथील फॉगिंग मशीन अजूनही बंद आहे. १२ ग्रामपंचायतींकडे स्वतःच्या १२ फॉगिंग मशीन पूर्णपणे बंद पडल्या आहेत. यामुळे ग्रामीण व शहरी भागातील फॉगिंग प्रक्रिया मशीनअभावी बंद आहे.
------------------
तोकडी उपायोजना
अचलपूर नगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात डेंग्यूच्या अनुषंगाने कुठेही परिणामकारक उपायोजना नाही. त्याकडे संबंधित प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. जिथे पाणी साचले आहे किंवा पाण्याचे डबके आहे, त्या ठिकाणी यंत्रणेने सोडलेले हजारो गप्पी मासेदेदीखल निरुपयोगी ठरले आहेत.
----------------------
बंद असलेली फॉगिंग मशीन तात्काळ दुरुस्त केली जाईल, तर नव्याने दुसरी फॉगिंग मशीन विकत घेतली जाणार आहे. डेंग्यूच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपायोजना युद्धस्तरावर करण्याचे निर्देश नगरपालिका प्रशासनास देण्यात आले आहेत.
- बंटी ककरानिया, आरोग्य सभापती, नगर परिषद अचलपूर.
----------------
पंधराव्या वित्त आयोगाच्या बंदिस्त निधीअंतर्गत आराखड्यात समाविष्ट करून फॉगिंग मशीन ग्रामपंचायतींना विकत घेता येतात. तसे निर्देश ग्रामपंचायतींना यापूर्वीच दिले. डेंग्यूच्या अनुषंगाने ग्रामीण भागात फवारणी केली जात आहे.
- जयंत बाबरे, गटविकास अधिकारी