अनिल कडू
परतवाडा : अचलपूर तालुक्या १० दिवसांत ३०० हून अधिक कोरोना रुग्ण नोंदले गेले आहेत. पैकी २०० रुग्ण परतवाडा, अचलपूर शहरातील असून उर्वरित ग्रामीण भागातील आहेत. यात १ ते ४ वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींचाही समावेश आहे. तालुका महसूल व आरोग्य प्रशासनाची ही आकडेवारी असली तरी याहून तीनपट रुग्ण तालुक्यात आहेत. प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची संख्या संशयास्पद आहे. याबाबत तालुक्याचे आरोग्य प्रशासन माहिती देण्यास तयार नाही.
ग्रामीण भागात केवळ तिघांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती आरोग्य तथा महसूल यंत्रणेकडे आहे. अचलपूर व परतवाडा शहरातील मृत्यूची आकडेवारी संबंधित यंत्रणेकडे उपलब्ध नाही. दरम्यान दहाहून अधिक कोरोना रुगांच्या मृत्यूची माहिती आहे. अनेक लोक कोरोना लपवत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची माहिती प्रशासनाला देण्यास टाळाटाळ करीत आहे. शहरासह ग्रामीण भागात वाढती कोरोना संख्या असली तरी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष चालविले आहे. निर्जंतुकीकरण केले जात नाही. सर्वत्र स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. रुग्णालयात किंवा कोरोना केंद्रावर दाखल रुग्णांना बेचव जेवन दिल्या जात आहे. चहा, नास्ता आणि जेवणाच्या वेळा संबंधित यंत्रणेकडून पाळल्या जात नाहीत. तालुक्यात मास्क लावणाऱ्यांचे प्रमाण आजही नगन्य आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा सर्वत्र फज्जा उडत असून गर्दीकडे दुर्लक्ष आहे. दुकानासमोरील, बाजार पेठेतील ते गोल, चौकोण आज गायब झाले आहेत. प्रशासन सरळसरळ नागरिकांनाच दोष देत आहे. यात कोरोनाची नियमावली पायदळी तुडविल्या जात आहे.
राज्यमंत्र्यांचे टिष्ट्वट
अचलपूरचे आमदार तथा राज्यमंत्री बच्चू कडू दुसºयांदा कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. तसे टिष्ट्वट त्यांनी शुक्रवारी केले. संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करवून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.