अमरावती विभागात अव्वल : चांदूररेल्वे पंचायत समितीलाही पुरस्कारपरतवाडा / चांदूररेल्वे : यशवंत पंचायत राज अभियान सन २०१५-१६ अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील दोन पंचायत समित्यांना तीन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अचलपूर पंचायत समितीला राज्यात तिसरे, तर अमरावती विभागात पहिले स्थान मिळाले आहे. याशिवाय चांदूररेल्वे पंचायत समितीला विभागातून दुसरे स्थान मिळाले आहे. मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव सुमित मलिक, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्या हस्ते अचलपूर व चांदूर रेल्वे पंचायत समितीच्या सभापती व उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले. सन २०१५-१६ या कालावधीत अचलपूर पंचायत समितीने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यातून तिसरे स्थान मिळविले आहे. राज्यातून तिसरे स्थान मिळविल्याबद्दल तृतीय क्रमांकाचे १५ लाख रुपयांचे पारितोषिक व सन्मान चिन्ह देण्यात आले. अमरावती विभागातून प्रथम स्थान मिळविल्याबद्दल ११ लाख रुपयांचे पारितोषिक व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंचायत समितीचे सभापती देवेंद्र पेटकर व इतर पदाधिकारी, गट विकास अधिकारी, सहा गटविकास अधिकारी डब्ल्यू एम कनाटे, विकल मेहरा, नितीन पवार, आकाश फुसकुलवाड, राजेंद्र काळे, आशिष निमकर, भैय्या काकडे, जुनेद बंग, दीपक टाले उपस्थित होते. पंचायत समितीने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल व नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. यामुळे तालुक्यात विकासकामे गतीने होतील. - बाळासाहेब रायबोले, गटविकास अधिकारी, अचलपूर चांदूर रेल्वे विभागात द्वितीय यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत चांदूररेल्वे पंचायत समितीला अमरावती विभागातून द्वितीय स्थान मिळाले आहे. आठ लाख रुपये रोख व सन्मान चिन्ह असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराला पंचायत समिती सभापती किशोर झाडे, गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड, सहा. गटविकास अधिकारी सोनाली मानकर यांच्यासह पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे याच्या हस्ते स्वीकारला. चांदूररेल्वे पं.स.ने यशंवत पंचायत राज अभियानात सन २०१२-१३ पासून सलग पाच वेळा सहभाग नोंदवून विक्रम केला आहे. तीन वेळा सलग प्रथम पुरस्कार प्राप्त करीत हॅट्ट्रिक नोंदविली आहे. (तालुका प्रतिनिधी)
‘पंचायत राज’मध्ये अचलपूरची छाप
By admin | Published: April 16, 2017 12:11 AM