‘लोकमत’च्या चित्रफितीची दखल : कोरोनाच्या संकटकाळात राबविला उपक्रम, गुरुपौर्णिमेला राज्यातील दहा शिक्षकांचा गौरवपरतवाडा : लॉकडाऊनच्या काळात तंत्रस्रेही शिक्षण देणाऱ्या राज्यातील १० शिक्षकांवर ‘लोकमत’ने तयार केलेल्या चित्रफितीची दखल गुरूपौर्णिमेच्या दिवशी मुंबईला घेतली गेली. या १० शिक्षकांना गुरूपौर्णिमेलाच सन्मानपत्र, ११ हजार रुपये रोख व गिफ्ट हॅम्पर देऊन गौरविण्यात आले.यात अचलपूर पंचायत समिती अंतर्गत सावंगी येथील जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुनीता लहाने यांचा समावेश आहे. त्यांनी त्यांच्या कृतीतून गणित पेटीला हा बहुमान मिळून दिला. सुनीता लहाने यांनी गणितासारखा कठीण विषय गणित पेटीच्या मदतीने आपल्या व्हिडीओंच्या माध्यमातून सोपा करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविला. त्यांनी याकरिता स्वत:चे यूट्यूब चॅनल सुरू केले. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी एकूण ४९ व्हिडीओ बनविलेत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, ३ पैसे, ५ पैसे, १० पैसे, २० पैसे या जुन्या नाण्यांच्या मदतीने लहाने यांनी नाण्यांचे नोटांत आणि नोटांचे नाण्यांमध्ये रुपांतर विद्यार्थ्यांपुढे मांडले. कोविडच्या भीतीयुक्त वातावरणातून बाहेर पडून शिक्षकांकरिता बनविलेले हे व्हीडीओ पालकांसह विद्यार्थ्यांनाही उपयोगी पडले आहेत. लॉकडाऊनच्या काळात उपक्रमशील, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या सामान्य शाळेवर कार्यरत, तंत्रस्रेही शिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमाची ‘लोकमत’ने दखल घेतली.यात राज्यातील निवडक लक्षवेधक उपक्रमांवर 'लोकमत'चे पत्रकार अतुल कुळकर्णी यांनी एक चित्रफीत तयार केली. वा...। क्या बात है गुरूजी।। या शीषर्काखालील ही चित्रफीत राज्यभर पाहिली जात आहे.यात ही चित्रफीत काही बड्या कंपन्यांच्या संचालकांपर्यंत पोहचली. ५ जुलैला संचालकांनी दहाही शिक्षकांसमवेत बैठक घेतली. त्यांना पुरस्कृत केले. यात रणजीतसिंह डिसले (परितेवाडी, सोलापूर), सविता बोरसे (नाशिक), बालाजी जाधव (विजयनगर, सातारा), मृणाल गांजले (पिंपळगाव म्हाळुंगे, पुणे), शमशुद्दीन अत्तार (शिरगाव, सिंधुदुर्ग), सुनील अलुरकर (हिंगणी, नांदेड), अमोल हंकारे (खोत, सांगली), मानाजी माने (सोलापूर), सुनीता लहाने (अचलपूर अमरावती) यांचा समावेश आहे.ऑनलाईन शिक्षण हा पर्याय नाही. ही पुरवणी आहे. गणितात गणित पेटीचे महत्व अधिक आहे. शासनाकडून शाळांना मोफत उपलब्ध करून दिलेली गणित पेटी म्हणजे गणिताची प्रयोगशाळाच आहे. गणितातील लहानमोठ्या संकल्पना स्पष्ट करण्याकरिता गणित पेटी अधिक उपयोगी आहे.- सुनीता लहाने, विषय सहायक, अमरावती
अचलपूरच्या शिक्षिकेच्या गणित पेटीने पटकावला बहुमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 5:00 AM