अमरावती : सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. परिणामी, उन्हाचे दाहकतेसोबतच पिण्याच्या पाणीटंचाईची झळ ही ग्रामीण भागात जाणवू लागली आहे. जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. जिल्हाभरातील १४ पैकी ७ तालुक्यांमधील २६ गावांत २५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर एका गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात दरवर्षी मेळघाटातील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावेळी मात्र गैर आदिवासी भाग असलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यात पहिला पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी टँकर लागला आहे.
यंदा मार्चअखेर ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून मेळघाटातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट आले आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर या गावात टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे. याशिवाय १४ तालुक्यांपैकी ७ तालुक्यांतील २६ गावांमध्ये २५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचा यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा १२ कोटी ६० लाख रुपयांचा आहे. यंदाही तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने ३३ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित केले आहे. जिल्ह्यात यंदा ४९३ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकेत आहेत. मेळघाटासोबतच चांदूररेल्वे व भातकुली, अमरावती, तिवसा, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यांतील २६ गावांना सध्या पाणीटंचाईच्या झळ बसत आहेत. यामध्ये सर्वाधिक नांदगाव खंडेश्वर, मोर्शी या दोन तालुक्यांतच प्रत्येकी ८ याप्रमाणे १६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर अमरावती तालुक्यात पाचपैकी एका गावात बोअरवेल आणि इतर गावांमध्ये खासगी विहिरीद्वारे नागरिकांची तहान भागविली जात आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील ग्रामीण भागात विहीर अधिग्रहण आणि पाणीपुरवठ्यासाठी टँकरची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.
या गावांची तहान खासगी विहिरींवरभातकुली तालुक्यातील दाढीपेढी, अमरावतीमधील मोगरा, कस्तुरा, भानखेडा बु., पोहरा बंदी, इंदला, घातखेडा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर, नागझरी, पळसमंडळ, मंगररूळ चव्हाळा, वाटपूर, नांदुरा खुर्द, वाढोणा रामनाथ, प्रिंप्री गावंडा, मोर्शीमधील ब्राह्मणवाडा, शिरजगाव भि, गोराळा, पिपरी, दहसूर, गणेशपूर, कोळविहीर, तरोडा (डो.), चिखलदरा तालुक्यातील चुर्णी, चांदूर रेल्वे सावंगी मग्रापूर, तिवसामधील दिनानखेडा आणि चिखली या गावांचा समावेश आहे.