अमरावती: एप्रिल महिन्यातील रखरखीत उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडत असल्याने अनेक गावांना कोरड लागली आहे. पाणीटंचाईची तीव्रता वाढल्याने तात्पुरत्या उपाययोजना म्हणून सद्यस्थितीत खासगी ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले तर ११ गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करुन तहान भागविली जात आहे.
पावसाळ्यात चांदूरबाजार वगळता १३ ही तालुक्यांत पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे जमिनीचे पुनर्भरण न झाल्याने मार्च पश्चात भूजलस्तरात कमी येत आहे. त्यामुळे अनेक गावांचे जलस्त्रोत आता कोरडे पडत असल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. त्यातुलनेत करावयाच्या उपाययोजना आचारसंहितेत अडकल्याने अनेक गावे तहानली आहे. आयोगाचे निर्देशानुसार केवळ टँकर सुरु करणे व विहिरींचे अधिग्रहण यालाच मुभा असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
प्रशासनाच्या साप्ताहिक अहवालानुसार सद्यस्थितीत अमरावती तालुक्यात ७, भातकुली १, चांदूर रेल्वे ३, नांदगाव खंडेश्वर १६, अचलपूर ३, मोर्शी ११ तसेच वरुड व चिखलदरा तालुक्यात प्रत्येकी दोन खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहेत.
आठ गावांची तहान ११ टँकरवरसद्यस्थितीत चांदूर रेल्वे तालुक्यात सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यात बेला (सलोना), मोथा, धामकटडोह, आकी, बहाद्दरपूर गौलखेडा बाजार येथे प्रत्येकी १ तर खडीमल येथे चार टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे अद्यापही पूर्ण झालेली नसल्याने तात्पुरती उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.