गणेश वासनिक
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठ संलग्न महाविद्यालयात एक - दोन नव्हे, तर चक्क १९ जणांनी बनावट नेट / सेट प्रमाणपत्र मिळवून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक म्हणून गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवली. या गंभीर प्रकरणी काही सुजाण नागरिकांनी थेट पोलिसात तक्रार दिली. त्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने विद्यापीठाला १९ जणांची यादी महाविद्यालयाच्या नावासह पाठवली. मात्र, दोन महिन्यांपासून या बनावट प्रमाणपत्रांची ना पडताळणी झाली, ना ठोस निर्णय झाला. त्यामुळे बनावट प्रमाणपत्र मिळविणाऱ्या प्राध्यापकांना पाठीशी घालण्याचे काम तर सुरू नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.
केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील कला, विज्ञान महाविद्यालयाचे सहयाेगी प्राध्यापक सुरेंद्र चव्हाण यांचे नेट परीक्षा प्रमाणपत्र ‘फेक’ असल्याचे २७ ऑक्टोबर २०२३ रोजी जाहीर केले. त्यानंतर आता अमरावती विद्यापीठाला जाग आली असून, बनावट नेट-सेट प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी महाविद्यालयांना पत्रव्यवहार करण्यात येत आहे. दोन महिन्यांपासून या गंभीर बाबीवर विद्यापीठाने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही.
बनावट नेट - सेट प्रमाणपत्र कोठून आले? संबंधित प्राध्यापकाच्या नियुक्त्यांच्या वेळी या ‘फ्रॉड’ प्रमाणपत्राची वरिष्ठांनी शहानिशा का केली नाही? विद्यापीठाचादेखील यात सहभाग आहे का? अशा अनेक प्रश्नांचा विद्यापीठाने उलगडा केला नाही. आर्थिक गुन्हे शाखेने ७ सप्टेंबर २०२३ रोजी अमरावती विद्यापीठाला बनावट नेट - सेट प्रमाणपत्र मिळविणाऱ्या प्राध्यापकांची यादी पाठवूनसुद्धा कार्यवाहीसाठी विद्यापीठाने कोणतेही पाऊल उचलले नाही, हे विशेष.
ना. चंद्रकांत पाटील आज विद्यापीठात
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवार, २४ नोव्हेंबर रोजी अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. अमरावती विद्यापीठाच्या डॉ. के.जी. देशमुख सभागृहात दुपारी १:०० वाजता माजी कुलगुरू स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे पाटील यांनी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात बनावट नेट - सेट प्रकरणाचा तडा लावण्यासाठी यंत्रणेला निर्देश द्यावेत, अशी मागणी अन्यायग्रस्त युवकांची आहे.
पोलिस आयुक्तालय स्तरावर विविध तक्रारींच्या अनुषंगाने बनावट नेट - सेट प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी प्राध्यापकांची नावे महाविद्यालयासह अमरावती विद्यापीठाला पाठविली आहेत. त्यानुसार विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना पत्र पाठविल्याची माहिती आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळविणे, ही बाब गंभीर आहे. यात कायदेशीर बाबी तपासून लवकरच गुन्हा दाखल केला जाईल.
- शिवाजी बचाटे, निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अमरावती
आमच्या महाविद्यालयातील चार प्राध्यापकांच्या नेट - सेट प्रमाणपत्रांसंदर्भात तक्रारी असल्याची माहिती आहे. मात्र, याविषयी विद्यापीठातून अधिकृतपणे कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. सन २००५ ते २०२० या कालावधीत चारही प्राध्यापकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.
- डॉ. आर.ई. खडसान, प्राचार्य, श्री ज्ञानेश्वर मस्कूजी बुरुंगले विज्ञान व कला महाविद्यालय, शेगाव, जि. बुलढाणा