परतवाडा : अचलपूर तालुक्यात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांचा आकडा पाहता, प्रशासनाने आता कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. दोन दिवसांमध्ये महसूल, पोलीस, नगर परिषद व इतर शासकीय विभागामार्फत ३०० नागरिक, ३५ दुकाने व एका मंगल कार्यालयावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी अचलपूर गाठून उपविभागीय अधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यात उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर, मुख्याधिकारी नगर परिषद अचलपूर, गटविकास अधिकारी अचलपूर यांना नियम मोडणाºयांवर सक्त कारवाईसोबतच कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश दिले. नियमांचे पालन न करणाºया सर्व प्रकारचे दुकाने, हॉटेल, रेस्टाॅरेंट, बार, प्रवासी वाहनांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
---------------------
चांदूर बाजारात मुख्याधिकाºयांची रजा, नागरिकांना सजा!
चांदूर बाजार - जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने संसर्गाचा झपाटा वाढविला. चांदूर बाजार तालुक्यातही कोरोनाच्या दुस०या टप्प्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. व्यापारी वर्गात सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, पालिका हद्दीत ज्यांच्यावर प्रशासनाची सर्वाधिक जबाबदारी आहे, ते पालिकेचे मुख्याधिकारी पराग वानखडे दीर्घ काळापासून रजेवर आहेत. त्यामुळे पालिकेतर्फे मास्क न वापरणाºयांविरुद्ध केली जाणारी कारवाई ही मनात येईल तेवढ्याच तासांपुरती मर्यादित झाली आहे.
तालुक्यात आतापर्यंत एकूण ४६४ कोरोना रुग्ण आढळले. पैकी १२ जणांचा मृत्यू झाला. अद्यापही २० रुग्ण अॅक्टिव्ह असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना भगत यांनी दिली. तहसीलदार धीरज स्थूल, गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरगडे, पोलीस निरीक्षक सुनील किणगे संपूर्ण बाजारपेठेत मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरच्या वापराबाबत आवाहन करीत आहेत. सर्व बँक कर्मचारी, दुकानदार , चहा टपरी, हमाल, भाजीपाला विक्रेत्यांना समज देण्यात आली आहे. एकीकडे तहसीलदार धीरज स्थूल अंमलबजावणी करण्यासाठी दिवस-रात्र एक करीत असताना, मुख्याधिकारी पराग वानखडे हे गेल्या अनेक दिवसांपासून कर्तव्यावर उपस्थित नाहीत.
दरम्यान, चांदूर बाजार पालिकेचे नगराध्यक्ष, माजी उपाध्यक्षांसह त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यानंतरही पालिका प्रशासनाला अद्याप जाग आलेली दिसत नाही.
------------------