प स मध्ये आढावा बैठक
फोटो -
धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जरी कमी झाली असला तरी आगामी काळात येणाऱ्या तिसरा लाटेचा धोका लक्षात घेऊन तालुकास्तरावर योग्य नियोजन करून प्रत्येक गावाला स्वच्छ पाणी द्यावे. ब्लिचिंगचा वापर टाळल्यास ग्रामसेवकावर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
स्थानिक पंचायत समितीमध्ये सर्व विभागांची आढावा बैठक बुधवारी दुपारी अविश्यांत पंडा यांनी घेतली. पावसाळा सुरू झाल्यानंतरही पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण झाली नसतील, तर अशा कंत्राटदारांना तंबी देऊन सात दिवसांत ही कामे पूर्ण करावी. पंधरावा वित्त आयोग, रमाई, पंतप्रधान, शबरी घरकुल योजनेसाठी लाभार्थींना प्रशासकीय कार्यालयापर्यंत येऊ देऊ नये. त्वरित दिलेले लक्ष्यांक पूर्ण करावे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जल-जीवन मिशनचा लाभ लाभार्थींना मिळाला नसेल, तर यातील त्रुटी त्वरित दूर कराव्या. पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात विविध आजारांची लागण होणार नाही, याविषयी आरोग्य विभाग कितपत सज्ज आहे, त्याची प्रश्नावली त्यांनी या बैठकीत विचारली. तालुक्यातील ग्रामपंचायतींना आयएसओ दर्जा मिळण्यासाठी अधिक प्रयत्न करावे. बचत गटांची निर्मिती झाली, मात्र राज्यात मॉडेल दाखवणारा गट या तालुक्यात तयार झाला नाही. अंगणवाडीचे अ, ब, क, ड नुसार गटनिहाय सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश या बैठकीत पंडा यांनी दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, दिलीप मानकर, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सावळकर, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे, प्रशांत जोशी, किशोर चव्हाण, मिलिंद ठुनुकले, एन.आर. मोटे, अमोल गोफणे, सारंग काळे, इंदलचंद राठोड, महमूद खान, श्रुतिका गुंबळे, दिलीप चव्हाण, राहुल ठाकरे यांची उपस्थिती होती .