अमरावती : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात विविध विभागातील अधिकारी, पोलीस अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांचे २० पथकांद्वारा दंडात्मक कारवाई केल्या जाणार आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत ही धडक मोहीम सुरू राहील. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी सायंकाळी जारी केले.
आदेशानुसार, उपजिल्हाधिकारी रणजित भोसले यांच्या नियंत्रणात राज्य कर निरीक्षक आशिष तिवारी यांचे पथक कोर्ट परिसरात, अन्नधान्य वितरण अधिजकारी परशुराम भोसले यांचे पथक गाडगेबाबा मंदिर परिसरात, सहायक कामगार आयुक्त अनिल कुंटे यांचे पथक भाजीबाजार परिसरात, डीडीआर संदीप जाधव यांचे पथक मोची गल्ली, समाजकल्याण सहायक आयुक्त मंगला मून यांचे पथक कॉटन मार्केट परिसरात कारवाई करेल.
उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर यांच्या नियंत्रणात सहायक संचालक कौशल्य विकास प्रफ्फूल शेळके यांचे पथक दस्तुरनगर परिसरात, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी गुठळे यांचे पथक रुक्मिणीनगर परिसरात, जलसंधारण विभागाचे रासनकर यांचे पथक इतवारा बाजार परिसरात, उद्योग निरीक्षक जी.बी. सांगळे यांचे पथक जवाहर गेट, सराफा परिसरात, जीएसडीएचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड गुलशन मार्केट परिससरात कारवाई करेल.
उपजिल्हाधिकारी राम लंके यांचे नियंत्रणात एडीटीपी वाघाडे यांचे पथक जवाहर रोड परिसरात, डीपीओ वर्षा भाकरे यांचे पथक रविनगर परिसरात, उद्योग निरीक्षक एन.एन. इंगळे यांचे पथक गांधीनगर परिसरात, एएडीटीपी श्रीकांत पेठकर यांचे पथक मालटेकडी परिसरात, तर उपअभियंता (उर्ध्व वर्धा) द. गो. पवार यांचे पथक नवाथे चौक परिसरात कारवाई करेल.
अमरावतीचे एसडीओ उदयसिंह राजपूत यांच्या नियंत्रणात नगर रचनाकार रणजितसिंह तनपुरे यांचे पथक जयस्तंभ चौक परिसरात, एसटीओ सागर मोटघरे यांचे पथक राजकमल चौक परिसरात, एसटीआय रीतेश पिल्ले यांचे पथक इर्विन चौक परिसरात, एसटीआय राजेश राऊत यांचे पथक मालटेकडी परिसरात व एसटीआय मंगेश भोनखाडे यांचे पथक पंचचवटी चौक परिसरात कारवाई करणार आहे.
बॉक्स
अशी राहणार दंडात्मक कारवाई
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये, चेहऱ्यावर मास्क न लावल्यास ५०० रुपये, दुकानामध्ये फिजिकल डिस्टन्सचे पालन नसल्यास व दोन ग्राहकांमध्ये कमीत कमी तीन फुटांचे अंतर नसल्यास ग्राहकांना ३०० रुपये व दुकानदारांना तीन हजार रुपयांचा दंड राहील. दुकानदारांनी वस्तूंचे दरपत्रक न लावल्यास तीन हजार रुपये दंडाची कारवाई केली जाणार आहे. याशिवाय दुसऱ्यांदा महापालिका प्रशासनाद्वारा आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे.