अमरावती : खरीप हंगामाला सुरुवात होत असल्याने बियाणे, खते व कीटकनाशके खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रात गर्दी करीत आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून विभागातील सर्व कृषी केंद्रांमध्ये दर्शनी भागात साठा व दर फलक अद्ययावत नसल्यास तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश विभागीय कृषी सहसंचालक के. एस. मुळे यांनी कृषी अधिकाऱ्यांना बुधवारी दिले.
कृषी केंद्रांची नियमित तपासणी करुन अनियमितता आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना यापूर्वीच वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांना दिल्याचे मुळे म्हणाले. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून कृषी निविष्ठांची खरेदी करावी व अंतिम तारीख तपासून पक्की पावती घ्यावी. शिवाय खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टन, पिशवी, बॅग, टॅग पावती, कापणी होईपर्यंत जपून ठेवावी व बियाण्यांची पाकिटे सीलबंद असल्याची खात्री करावी. कमी वजनाच्या तसेच छापील किमतीपेक्षा जास्त दराने निविष्ठांची विक्री होत असल्यास १८००-२३३-४००० व ९८२२४४६६५५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा जवळच्या कृषी कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन मुळे यांनी केले आहे.
सोयाबीन पेरणीसाठी घरचे बियाणे उपयुक्त असल्याने बीजप्रक्रिया व उगवणशक्ती तपासून घ्यावी, याद्वारे उत्पादन खर्चात बचत होणार आहे. १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये व गावातील अनधिकृत व्यक्तीकडून बियाणे खरेदी करू नये, असे कृषी उपसंचालक म्हणाले.
बियाणे, खतांची लिंकिंग असल्यास कारवाईनिविष्ठांची खरेदीवेळी विक्रेत्यांकडून लिंकिंगची सक्ती केली जात असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाकडे तक्रार करावी. बाजारात राऊंड अप बीटी, एचटीबीटी, बीजी-३ अशा प्रकारच्या प्रतिबंधित कपाशी बियाण्यांची खासगी व्यक्तीमार्फत घरपोच विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे फसवणूक होत असल्यास खबरदारी घेणे महत्त्वाचे असल्याचे मुळे यांनी सांगितले.
या क्रमांकावर करा तक्रार
शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांबाबत अमरावती विभागासाठी संजय पाटील (९४२३१३२६२६), बुलढाणा अरुण इंगळे (८१०४७९२०६३), अकोला सतीश दांडगे (९६६६२७३५०७), वाशिम आकाश इंगोले (९४२०३५३३०९), अमरावती सागर डोंगरे (८७८८८२१७८०) व यवतमाळ जिल्ह्यात कल्याण पाटील (९४२३४४३९०८) या क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.