अमरावती : शहरात अनधिकृत लॅबद्वारे रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता नसलेल्या व्यक्ती रुग्णांचे स्वॅब घेत असल्याचे निदर्शनात आले आहे. आता अशा लॅब रडारवर आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त रवि पवार यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये शहरातील पॅथालॉजी डॉक्टरांची आढावा सभा शनिवारी घेण्यात आली. यावेळी डॉ. विशाल काळे, डॉ. जयश्री नांदूरकर यांच्यासह सर्व पॅथालॉजी डाॅक्टर उपस्थित होते. डाटा एंट्री होत असताना रुग्णांचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता घेण्यात यावा, टेस्ट करणाऱ्या लॅबमध्ये काम करणाऱ्या सॅम्पल बॉय यांना फोटोसह ओळखपत्र देण्यात यावे. टेस्ट केलेल्या सर्व रुग्णांचे रेकाॅर्ड अद्ययावत ठेवण्यात यावे, त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींनी टेस्ट केलेली आहे त्यांनी अहवाल येईस्तोवर घराबाहेर पडू नये, पडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले.
महापालिाक क्षेत्रात सॅम्पल घेणाऱ्या सर्व लॅब यांचा डेटा महापालिकेसह जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास दैनंदिन ठेवण्यात यावा. सर्व नोंदी ‘आयसीएमआर’च्या पोर्टलवर रियल टाईम अद्ययावत करण्याचे निर्देश उपायुक्त पवार यांनी दिले.