अमरावती : रेल्वे परिसर अथवा ट्रॅकवर गुरे चरताना अपघाताच्या घटना होतात. गुरांचे अपघात रेल्वे प्रशासनासाठी चिंतनीय बाब असून प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे क्षेत्रात गुरे येऊ नये, यासाठी भुसावळ मध्य रेल्वे विभागाने ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बलाने वर्षभरात ११२ पशुपालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
रेल्वेने गुरांचे अवागमन मार्ग शोधून काढले आहेत. आरपीएफने यापूर्वी रेल्वेच्या धडकेत गुरे चिरडण्याच्या घटनांचा मागोवा घेतला आणि अपघातप्रवण स्थळ निश्चित करण्यात आले आहे. गुरांचे अपघात हा रेल्वेचा प्रमुख चिंताजनक एक विषय आहे. गुरे रेल्वे खाली चिरडण्याच्या अपघातामुळे पशुपालकांचे नुकसान होते, पण रेल्वेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होते. किंबहुना रेल्वे प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. रेल्वेची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता रेल्वे परिसरात गुरांचा वावर असल्याप्रकरणी १५ ते २९ डिसेंबर २०२३ या दरम्यान विशेष धडक मोहीम राबविण्यात आली. ज्या ठिकाणी गुरे रुळांवर चिरडण्याची शक्यता आहे अशा स्थळांचे विश्लेषण करण्यात आले आहे. भुसावळ विभागात रेल्वेने गुरे चिरडण्याची ६४ संवेदनशील ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानक परिसर अथवा क्षेत्रानजीकच्या पशुपालकांना गुरे ट्रॅकवर येता कामा नये, यासाठी पशुपालकांना नाेटीस बजावण्यात आल्या आहेत. या अभियानात एकूण ५५५१ जणांना ताकीद देण्यात आली, तर ५३० पशुपालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या जमिनीत गुरे चारणाऱ्यांवर रेल्वे कायद्यान्वये ५७ गुन्हे दाखल करण्यात आले.
दहा ठिकाणी सीमा कुंपण, पाच जागेवर सीमा भिंतरेल्वेच्या धडकेत गुरे चिरडण्याच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून भुसावळ विभागाने दहा ठिकाणी सीमा कुंपण घातले आहे. तर पाच जागेवर सीमा भिंत उभारली आहे. काही ठिकाणी हद्दवाढीचे कामे प्रस्तावित असून ते प्रगतीपथावर आहेत. ही कार्यवाही रेल्वेचे अभियांत्रिकी व आरपीएफ संयुक्तपणे करीत आहेत.
ट्रॅकजवळ व रेल्वेच्या जमिनीवर कचरा, खाद्यपदार्थ आदी टाकू नये, जेणे करून गुरे रेल्वेलाइन जवळ येणार नाहीत. रेल्वेच्या जमिनीवर, रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला गुरे चारणे टाळावे जेणेकरून मोठे अपघात टाळता येतील.- श्रीमती इति पांडे, मंडळ रेल्वे प्रबंधक, भुसावळ