अमरावती : दप्तरदिरंगाई करणाऱ्या जिल्हा परिषदेतील पाच कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांना दिले आहेत. सीईओंच्या या आदेशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सीईओंनी दिलेल्या आदेशामध्ये तीन कर्मचाऱ्यांची खातेचौकशी, दोन जणांना शो कॉज आणि एका कर्मचाऱ्यांनी मेळघाटात बदली करण्याच्या सूचना दिलेल्या आहे. यामध्ये एका एनआरएचमधील कर्मचाऱ्यांची खाते चौकशी केली जाणार आहे.
जिल्हा परिषद आरोग्य व एनआरएचएम विभागातील वाढत्या तक्रारींची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांनी गत सोमवारी नियोजन भवन येथे तीन तास आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी आरोग्य विभाग व एनआरएचएममधील कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत राबविण्यात येणारे योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे आढाव्यात आढळून आले होते. याशिवाय आरोग्य विभागातील कामकाजातील मरगळ लक्षात घेता येथील काही कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेखी खुलासा मागविला होता. अशातच गुरूवारी या कर्मचाऱ्यांची सीईओंनी सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान तीन कर्मचाऱ्यांची खातेचौकशी, दोघांना शो कॉज, तर एकाची मेळघाटात बदली करण्याचे निर्देश सीईओंनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.