अमरावती : स्वत:च सुसाइड नोट व्हायरल करून वनविभागाला बदनाम करणाऱ्या मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत घटांग येथील सहायक वनसंरक्षक व्ही. पी. वसव यांच्यावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने नागपूर येथील वनबल भवनातून सूत्रे हलली असून, वसव यांना लेखी समज देऊन खुलासा मागविला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच एसीएफ वसव यांची मेळघाटातून बदली अटळ मानली जात आहे.
सहायक वनसंरक्षक व्ही. पी. वसव यांनी १० एप्रिल २०२२ रोजी सुसाइड नोट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी वरिष्ठ वनाअधिकारी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. हरिसाल येथील वन परिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च २०२१ शासकीय निवासस्थानी रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यामुळे वन विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. दीपाली यांच्या आत्महत्या प्रकरणातून वन विभाग कसेबसे सावरण्याचा प्रयत्न करीत असताना सहायक वनसंरक्षक व्ही. पी. वसव यांनी सोशल मीडियावर सुसाईड नोट व्हायरल करून एकच खळबळ उडवून दिली होती. याप्रकरणी वनसंरक्षक जी. के. अनारसे यांच्या अध्यक्षतेत वनवृत्त कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी मोईन अहमद, सहाय्यक वनसंरक्षक ज्योती पवार हे समिती सदस्यांनी एसीएफ वसव यांचे बयाण नोंदविले होते. या चौकशी समितीने अहवाल वरिष्ठांकडे पाठविला होता, हे विशेष.सहायक वनसंरक्षक व्ही.पी. वसव यांच्या अफलातून प्रकारामुळे वन खात्याची प्रचंड बदनामी झाली. वसव यांच्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार वसव यांना सुसाइड नोटप्रकरणी लेखी समज दिला जाणार आहे. येत्या काळात बदलीचा देखील प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
-जी.के. अनारसे, मुख्य संरक्षक, प्रादेशिक विभाग अमरावती.