अचलपूर : धूलिवंदन सणानिमित्त अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी दारूच्या अंमलात गाडी चालविणारे, दारू विकणारे तसेच मोटार वाहन कायद्यान्वये अनेक कारवाया पोलिसांनी केल्या.
देवानंद शिवदास माहोरे (२४, रा. मेहराबपुरा) हा त्याच्या ताब्यातील मोटार सायकल दारूच्या नशेत चालवताना आढळून आल्यावर त्याच्यावर कलम १८५ मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. राहुल सुभाष माहोरे (१९, रा. मेहराबपुरा) हा दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी हमरस्त्यावर हातवारे करून धुमाकूळ घालत होता. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. रवि अजाबराव शहारे (३०, रा. मोहननगर, परतवाडा) याच्या ताब्यातून गोपनीय माहितीवरून ४९०० रुपयांचा विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय मोटार वाहन कायद्यान्वये ११ वाहनचालकांवर कारवाई करून १८०० रुपये दंड आकारण्यात आला. पूर्वी गुन्हे दाखल असणाऱ्या चार गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याकरिता कलम १०७, ११६ (३) फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.