अमरावती : महिनाभरापासून ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याने रोज ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढती आहे. सद्यस्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या उच्चांकी १० हजार पार झालेली आहे. यात विविध रुग्णालयांत २,१६० संक्रमित उपचार घेत आहेत. याशिवाय ७,८०१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढणार आहे.
जिल्ह्यात साधारणपणे सप्टेंबर महिन्यांपासून ज्या रुग्णाकडे स्वतंत्र रुम व स्वतंत्र प्रसाधनगृह आहे अशा रुग्णांना ‘होम आयसोलेशनची सुविधा दिली जात आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणांचे संक्रमित रुग्णांना १४ दिवस होम आयसोलेशनची सुविधा देण्यात देण्यात येत आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या लाटेत सवार्धिक ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४,२०० च्या दरम्यान होती. त्याचे दीडपट बेडची व्यवस्था दुसऱ्या लाटेसाठी असावयास हवी, अशी सूचना राज्याच्या आरोग्य संचालकांनी नोव्हेंबर २०२० मध्ये केली होती. जिल्ह्यात ग्रामीण भागात आता रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी कोरोना केअर सेंटर व मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत कोरोना हेल्थ सेंटर सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.
बॉक्स
आतापर्यंत २९ हजार रुग्ण होम आयसोलेटेड
जिल्ह्यात ८ मेपर्यंत २९,०१२ रुग्णांनी होम आयसोलेशनची सुविधा घेतली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात १४,५८८ तर ग्रामीणमधील १४,४२४ रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रात २,२१९ तर ग्रामीण भागात ५,५८२ रुग्ण होम आयसोलेटेड आहेत. या सुविधेमुळे सध्या तरी बेडचा तुटवडा जाणवत नसल्याची स्थिती आहे.
बॉक्स
ग्राम सुरक्षा समित्या असाव्यात ॲक्टिव्ह
सद्यस्थितीत ग्रामीण भागात पाच हजारांवर रुग्ण होम आयसोलोटेड असल्याने त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी गावागावांतील ग्राम सुरक्षा समिती ॲक्टिव्ह असावयास पाहिजे. महापालिका क्षेत्रात होम आयसोलेशनमधील रुग्ण घराबाहेर आढळल्यानंतर त्याच्यावर २५ हजारांचा दंड आकारण्यात आलेला आहे, असे कठोर निर्बंध देखील असावयास हवे.
पाईंटर
सद्यस्थितीथ ॲक्टिव्ह रुग्ण : ९,९६१
रुग्णालयात उपचार सुरू असलेले : २,१६०
होम आयसोलेशन (शहर) :२,२१९
होम आयसोलेशन (ग्रामीण) : ५,५८२