अमरावती: एमआयडीसीतील प्रतिबंधित प्लाॅस्टिक निर्मिती कारखान्यावर धाड घालून तब्बल ६४०० किलो प्लाॅस्टिक पन्नी जप्त करण्यात आली. ते दोन टिप्पर भरून असलेले प्लॉस्टिक राजापेठस्थित कोठ्यावर जमा करण्यात आले असून, ते लवकरच नष्ट केले जाणार आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाने बुधवारी दुपारी ही मेगा कारवाई केली. अलिकडच्या काळातील ही पहिली मोठी कारवाई ठरली आहे. विशेष म्हणजे त्यात प्रतिबंधित प्लॉस्टिक पन्नीसह त्यासाठी लागणारा कच्चा माल देखील आहे.
दस्तुरनगर भागात प्लॉस्टिकबंदीची मोहिम राबवत असताना स्वास्थ्य निरिक्षकांना भाजीविक्रेत्यांकडे एकसमान प्रतिबंधित प्लॉस्टिक पन्नी आढळून आली. मात्र, भाजीविक्रेत्यांकडून त्याबाबत जुजबी माहिती मिळाली. कुणीतरी सायकलवर सकाळीच येतो, त्याच्याकडून आम्ही त्या पन्न्या घेतो, असे सांगितले गेले. त्यामुळे स्वास्थ्य निरिक्षकांनी सलग दोन दिवस सकाळीच दस्तुरनगर भागाची झाडाझडती घेतली. त्यातील एकाने तो माल नागपूर वा मध्यप्रदेशातून येत नसून तो अमरावती एमआयडीसीमध्येच बनतो, असे सांगितले. त्या माहितीची पुरेसी खातरजमा केल्यानंतर स्वच्छता विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी एमआयडीसीतील अग्रवाल प्लॉस्टिक या मॅनुफॅक्चरल युनिटवर धाड घातली. यावेळी तेथे प्लॉस्टिक पन्नीची निर्मितीच सुरू असल्याचे दिसून आले.
याबाबत विशेष कार्य अधिकारी (घनकचरा) डॉ. सीमा नैताम यांना माहिती देण्यात आली. त्यांनी ती फॅक्टरी गाठून अग्रवाल यांना प्रतिबंधित प्लॉस्टिक निर्मितीबाबत विचारणा केली. तथा ते संपुर्ण ६४०० किलो प्लॉस्टिक जप्त करण्याचे निर्देश दिले. संबंधितांना पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यांना प्लास्टिक पन्नीचे काम बंद करण्याबाबत सख्त सुचना देण्यात आली. त्याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला माहिती देण्यात आली. जेष्ठ स्वास्थ निरीक्षक कुंदन हडाले, स्वास्थ निरीक्षक विक्की जेधे, शैलेष डोंगरे, आशिष सहारे, पंकज तट्टे, सागर इंगोले, शक्ती पिवाल, प्रियंका बैस, निखिल खंगाले, प्रवीण उसरे यांनी ही कारवाई केली.