- जितेंद्र दखनेअमरावती - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मध्ये अतिरिक्त असलेल्या चालकांची पडताळणी केली जात आहे. या चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) विभागामध्ये कायमस्वरूपी प्रतिनियुक्ती दिली जाणार आहे. मात्र, यासाठी चालकांना इच्छुक असल्याचा अर्ज करावा लागणार आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठस्तरावरून आलेल्या निर्देशाप्रमाणे अमरावती विभागातील ७६ एसटी बसचालकांनी या प्रतिनियुक्तीवर जाण्यासाठी स्थानिक एसटी प्रशासनाकडे अर्ज दाखल केले आहेत.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयाने राज्यातील आगारात अतिरिक्त चालक कुठे आहेत का? याची माहिती मागविली आहे. याअनुषंगाने अमरावती विभागातील आठ आगारांची माहिती गोळा केली आहे. यात कोणत्या आगारात किती चालक असून, त्यात किती अतिरिक्त आहेत, याची माहिती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यात चालक अतिरिक्त आहेत, त्यांना स्वजिल्ह्याच्या आरटीओ कार्यालयात कायमस्वरूपी प्रतिनियुक्ती मिळणार आहे. हा चालकांचा ऐच्छिक प्रश्न असून त्याकरिता अर्ज मागविले होते. त्यानुसार अमरावती येथील एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयाकडे अतिरिक्त असलेल्या ७६ चालकांनी आरटीओ विभागात प्रतिनियुक्तीवर जाण्याची तयारी दर्शविली आहे.
आगारनिहाय अतिरिक्त चालकांची माहिती मुख्यालयाकडून मागविली आहे. याकसाठी इच्छुक असलेल्या चालकांनी अर्ज करायचा आहे. त्यांचे वेतन आरटीओकडून मिळेल. ही प्रतिनियुक्ती कायमस्वरूपी राहणार आहे. अमरावती विभागात यासाठी ७६ जणांचे अर्ज आले आहेत.- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक