आयुक्तांचे निर्देश : वसतिगृहे, आश्रमशाळा, निवासी शाळांवर लक्षअमरावती : राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांनी आदिवासी समाजासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत तडजोड नाहीच, असा थेट इशारा आपल्याच यंत्रणेला शुक्रवारी दिला. वसतिगृहे, आश्रमशाळांचा दर्जा सुधारणे, इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश, साहित्य पुरवठा आदी विषयांवर त्यांनी लक्ष वेधले.येथील अपर आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला अपर आयुक्त गिरीश सरोदे, सहायक अपर आयुक्त नितीन तायडे, पांढरकवड्याचे प्रकल्प अधिकारी मीना, धारणीचे षणमृग राजन, पुसदचे सकवान, औरंगाबादचे बारसे, अकोल्याचे खोकले, कळमनुरीचे राठोड तर किनवटचे प्रकल्प अधिकारी भारुड हे उपस्थित होते. आदिवासी विकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव हे विदर्भात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी नागपूर येथील दौरा आटोपून त्यांनी शुक्रवारी अमरावती येथील अपर आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या सातही प्रकल्प अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. आयुक्त जाधव यांनी आदिवासींसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत कुचराई केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश देताना योग्य शाळांची निवड करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावर्षी वसतिगृहात विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश देण्याचे ठरविले आहे. आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया नियमानुसार झाली पाहिजे, ही दक्षता अधिकाऱ्यांनी घेण्याचा सूचना त्यांनी दिला. आॅनलाईन प्रवेशासाठी नव्याने सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. आदिवासी विद्यार्थी अथवा समाजासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करताना काही तक्रारी प्राप्त झाल्यास चौकशी अंती कारवाई केली जाणार, असे त्यांनी सांगितले. साहित्य पुरवठ्यात अनियमितता होऊ नये, दर्जेदार आहार पुरवठा करणारी यंत्रणा उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
आदिवासी योजनांमध्ये तडजोड नाहीच !
By admin | Published: June 18, 2016 12:02 AM