गणेश वासनिकअमरावती : आदिवासी मुला-मुलींना जगाशी संवाद साधता यावा, यासाठी राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा संभाषणासाठी नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नव्या शिक्षण प्रणालीतून विज्ञाननिष्ठ विचारसरणीकडे आदिवासी विद्यार्थ्यांचा कल असेल, असा विश्वास आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.राज्याचा आदिवासी विकास विभाग म्हटला की, अपहार, भ्रष्टाचार, अनियमितता असाच कारभार सुरू असल्याचे चित्र आपसूकच नजरेसमोर येते. परंतु मनीषा वर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी या विभागाची सूत्रे हाती घेताच गडबड अधिका-यांमध्ये आता काही खरे नाही? असे म्हणण्याचा प्रसंग ओढवला आहे. वर्मा यांनी आदिवासींच्या विकासासाठी योजना, उपक्रम सकारात्मकरीत्या राबविणार असल्याचे स्पष्ट केले. म्हणूनच द-या-खो-यात वास्तव्यास असलेल्या आदिवासींची मुले ही अन्य समूहाच्या तुलनेत शिक्षणात मागे राहू नये, त्यांच्यात आत्मविश्वास अन् आत्मसन्मान वाढावा, यासाठी अस्सल इंग्रजी भाषा संभाषणाचा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थी त्याचे लाभार्थी ठरणार आहेत. इंग्रजीतून संवाद, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, करियर गायडन्स, कौशल्य विकासाचे धडे, मार्केटिंग कौशल्य, आदिवासी महिलांना रोजगारासह कर्जपुरवठा, वनहक्क कायद्यांतर्गत जमिनींवर उत्पादन क्षमता वाढविणे, आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा, बालहक्क कायद्याची अंमलबजावणी, शाळा समितीला निधी खर्च करण्याची मुभा आदी विविध उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. विशेषत: शिक्षक, कर्मचा-यांना प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थी सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी आश्रमशाळांची आयएसओ मानांकन स्पर्धादेखील घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.तीन वर्षांत ४०० आश्रमशाळांमध्ये सायन्स मॉड्युल्सआदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानदृष्टी वाढावी आणि ज्ञानात भर पडावी, यासाठी राज्यात तीन वर्षांत ४०० आश्रमशाळांमध्ये सायन्स मॉड्युल्स हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. एकलव्य फाऊंडेशन व अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मॉड्युल्सप्रमाणे १० ते १५ शाळांची निवड केली जाईल. या उपक्रमाचे मेळघाटातील शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. शिक्षकांनी साकारलेले सायन्स मॉड्युल्स स्वत: आदिवासी विद्यार्थी किटस् हाताळतील. ते विज्ञानाचे धडे घेतील, असा प्रयोग पहिल्यांदाच ट्रायबलमध्ये सुरू झाल्याचे मनीषा वर्मा म्हणाल्या. ट्रायबलमध्ये रूटीन योजना सुरूच आहे. परंतु आदिवासींचा आर्थिकस्तर उंचवावा आणि रोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत तसेच महिला बचत गटाला कर्जपुरवठा आणि व्यवसायास संधी आदी नवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.- मनीषा वर्माप्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र
आदिवासी विद्यार्थी साधणार जगाशी संवाद, इंग्रजी भाषा संभाषणासाठी नवा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 6:25 PM