पदस्थापना; सीईओंच्या उपस्थितीत प्रक्रिया
अमरावती : जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील इयत्ता पाचवीचे वर्ग तुटल्यामुळे माध्यमिक शाळेतील रिक्त पदावर मराठी, उर्दू माध्यमाच्या २७ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया शुक्रवार १३ जुलै रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान उपस्थित होते.
जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत रावबिलेल्या समायोजन प्रक्रियेत मराठी माध्यमाच्या ८ शिक्षकांचे माध्यमिक शाळेतील रिक्त असलेल्या पदावर पदविधारक विषय निहाय पदस्थापना देण्यात आली आहे. याशिवाय प्राथमिक शाळेतील रिक्त पदावर अ पदविधारक ६, माध्यमिक शाळेतील रिक्त असलेल्या पदावर पदविधारक ८ शिक्षकांना विषयनिहाय पदस्थापना देण्यात आली आहे. माध्यमिक शाळेतील इयत्ता ९ ते १० चे शिक्षकांना सन २०१८ मध्ये त्यांचे विषयाचे पद रिक्त नसल्याने त्यांना इतर विषयांचे पदावर व इयत्ता ६ वी ते ८ चे पदावर पदस्थापन दिली होती. अशा शिक्षकांना त्याचमुळे पदावर पदस्थापना देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. ही प्रक्रिया पार पडण्यासाठी शिक्षण विभागाचे ऋषीकेश कोकाटे, तुषार पावडे, गजाजन कोकाटे, प्रसन्न पंत, अर्चना मानकर, विनोद विखार आदींचे सहकार्य लाभले.