अमरावती : देशात तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविल्याने सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासन या लाटेचा अटकाव करण्यासाठी सज्ज झाले आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत दीडपट यंत्रणा व सुविधा आतापासूनच सज्ज ठेवल्याची माहिती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यातील नागरिक हैराण झाले. यादरम्यान शेकडो जणांचे प्राण गेले असून रुग्णांची संख्यादेखील बाराशेच्यावर पोचली होती. परंतु जिल्ह्यात उपाययोजना करून यावरदेखील नियंत्रण मिळवले. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली असून रुग्ण संख्या दहाच्या आत आहे. अशातच तज्ज्ञांनी देशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनालादेखील अलर्ट केले आहे. तिसरी लाट आल्यास रुग्णांच्या सुविधेकरिता यंत्रणा कमी पडू नये, याकरिता प्रशासन सज्ज आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत दीडपट सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिली.