फोटो - २५ एस चांदूर बाजार
महसूल, पोलीस व पंचायत विभागाची सयुक्त कारवाई; ग्रामपंचायतची तक्रार
चांदूर बाजार : शिवजयंतीच्या आदल्या रात्री १८ फेब्रुवारीला तालुक्यातील तळवेल येथे ग्रामपंचायतच्या जागेवर रस्त्यातच अज्ञातांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. याबाबत तळवेलच्या सरपंचांनी १९ फेब्रुवारीला पोलीस स्टेशन चांदूर बाजारला तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महसूल, पोलीस व पंचायत समिती प्रशासनाने गावात २० फेब्रुवारीला मुनादी देऊन गावकऱ्यांना पुतळ्याची जबाबदारी घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाच्या आवाहनाला २२ फेब्रुवारीपर्यंत गावकऱ्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने २३ फेब्रुवारीला सकाळी ७ पासून सदर अनधिकृत पुतळा हटविण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी आरसीपी तुकडीसह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
------------
सचिवांकडे सोपविला पुतळा
सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य गण व ग्रामस्थांसोबत १० तास चर्चा झाल्यानंतर शिवरायांचे पूजन करून पुतळा हटविण्यात आला. रीतसर परवानगी घेईपर्यंत तो ग्रामपंचायत सचिवांच्याकडे सोपविण्यात आला आहे. हा पुतळा तळलेले ग्रामपंचायतीमध्ये ठेवण्यात आला आहे. चर्चेत नायब तहसीलदार देवेंद्र सवई, गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरगडे, मंडल अधिकारी दाते, विस्तार अधिकारी सातंगे, ग्रामविकास अधिकारी मनीष देशमुख, तलाठी प्रतीक चव्हाण, रवींद्र बोंडे, ठाणेदार सुनील किनगे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे, पेंदोर, खुपीया प्रशांत भटकर, वीरेंद्र अमृतकर आदी सहभागी झाले.
-------------
मध्यरात्री उभारला पुतळा
शासनाच्या नियमाप्रमाणे सार्वजनिक जागेवर थोर पुरुषांच्या पुतळा उभारणीसाठी रीतसर परवानगी घ्यावी लागते तसेच ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे, त्या जागामालकाचे ना-हरकत प्रमाणपत्रही आवश्यक असते. परंतु, तळवेल येथे मध्यरात्रीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगीसाठी आवश्यक शासकीय सोपस्कार न करताच उभारण्यात आला.
-------------
सरपंचांनी दाखल केली तक्रार
तळवेल येथील आठवडी बाजारात जिल्हा परिषद शाळेसमोर विटा-सिमेंटचा तीन फूट उंच चौथरा बांधून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पीओपीचा अर्धकृती पुतळा लावण्यात आला. पुतळ्यावरून तणाव होऊ नये, यासाठी सरपंच केमदेव कुराडे यांनी पोलिसांत रीतसर लेखी तक्रार दाखल केली. प्रशासनाने दिलेल्या मुदतीत या पुतळ्याची जबाबदारी कुणीही स्वीकारली नाही.
--------------