फोटो पी २५ चांदूर रूटमार्च
चांदूर बाजार : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यात जीवनावश्यक वस्तूंचे दुकान उघडण्यासाठी सकाळी ७ ते ११ पर्यंत अशी ४ तासांची मुभा देण्यात आली आहे. असे असताना दुकानदार दुकाने बंद करण्यासाठी पोलीस वाहनाचे सायरन वाजवण्याची प्रतीक्षा करतात. त्यानंतरही बऱ्याच वेळाने दुकाने बंद करण्यात येत नसल्याने स्थानिक पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्तासह रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.
चांदूर बाजारच्या बाजारपेठेचा अनुभव पोलिसांना नित्याचा झाला आहे. २ महिन्यांपासून तालुक्यासह जिल्ह्यात संचारबंदीचा नियम लागू केला आहे. मात्र, याची कोणतीच अंमलबजावणी होताना दिसत नव्हती. यात राजकीय पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे दुकानदार मनमर्जीने व्यवसाय करीत होते. अखेर शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस, महसूल व पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. त्यानुसार तालुक्यात आता पालिकेचे पथकही संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी दुकानांविरुद्ध धडक कारवाई करताना दिसत आहे.
संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी चांदूर बाजार शहरात पोलीस प्रशासनाकडून रूटमार्च काढण्यात आला. यात महसूल व पालिका प्रशासनाने सुद्धा सहभाग नोंदविला. दरम्यान काही दुकाने उघडी दिसल्याने त्यांना तूर्तास ताकीद देण्यात आली. दरम्यान नियमभंग करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. कडक लॉक डाऊन अंतर्गत राज्यात जिल्हा बंदी करण्यात आली आहे. आवश्यक सेवेतील प्रवाशांनाच प्रवासाची सूट देण्यात आली आहे.
बॉक्स १
अनावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या विरुद्ध कारवाईचे अधिकार पोलीस प्रशासनाला देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर रविवारी पोलीस प्रशासने रूटमार्च काढला. दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या पालिका, महसूल, पोलीस विभागातर्फ ११ वाजतानंतर ही दुकाने बंद न करणाऱ्यांना ताकीद देऊन याची पुनरावृत्ती झाल्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लावलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून शासन व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ठाणेदार सुनील किनगे यांनी केले. यावेळी पोलीस पथकात सहायक ठाणेदार नरेंद्र पेदूर, गजानन रहाटे, कीर्ती गावंडे, अचलपूरचे पोलीस अधिकारी भटकर, महसूल पथकाचे नायब तहसीलदार देवेंद्र सवई, पालिका पथकाचे रवींद्र जाधव, भूषण भट्ट, दिनेश शर्मा, संतोष डोळे आदी उपस्थित उपस्थिती होते.
त्या अतिक्रमणावर कारवाई
या रूटमार्च दरम्यान मुख्य मार्गावर एका फळ विक्रेत्याने रस्त्यावरच कापडी पाल टाकून मोठी दुकान थाटलेली दिसली. त्यामुळे पालिकेने पोलिसांस्या मदतीने ते अतिक्रमण मोकळे केले. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या जयस्तंभ चौकात जयस्तंभाला घेरून काही टरबूज विक्रेत्यांनी अतिक्रमण थाटले आहे. सदर अतिक्रमण हटविण्यास मात्र पालिका प्रशासन दिरंगाई दाखवीत आहे. हे अतिक्रमण न हटविण्यास राजकीय दबाव आल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे.