अमरावती : काम करण्याची मानसिकता नसल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आलेल्या दोन कर्मचाऱ्यांना पंधरवड्यानंतर पुनर्स्थापित करण्यात आले आहे. महापालिका प्रशासन कर्मचाऱ्यांच्या हिताबाबत किती सजग आहे, हे या ‘सुपरफास्ट’ आदेशातून स्पष्ट झाले असून आयुक्तांनी प्रशासकीय शिस्तीचा आदर्श वस्तुपाठ घालून दिल्याची प्रतिक्रिया महापालिका वर्तुळात उमटत आहे. प्रवीण ठाकरे व चंद्रकांत देशमुख अशी उभय कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांना २९ मार्च रोजी आयुक्तांच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले होते. मात्र, अवघ्या १५ दिवसांत अर्थात १५ एप्रिल रोजी विभागीय चौकशीच्या अधीन राहून त्यांना पुनर्स्थापित करण्याचे आदेश आयुक्तांनी पारित केले आहेत. कार्यालयीन कामाची निकड लक्षात घेता प्रशासकीय कारणास्तव प्रवीण बाबाराव ठाकरे, वरिष्ठ लिपिक क्रीडा विभाग आणि चंद्रकांत देशमुख प्र.क्रीडा अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ च्या पोटनियम ५ च्या खंड (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून पुनर्स्थापित करण्यात येत असल्याचा हा आदेश आहे. विभागीय चौकशीच्या अधीन राहून चंद्रकांत देशमुख यांना झोन क्र.१ रामपुरी कॅम्प येथे कनिष्ठ लिपिक आणि ठाकरे यांना भाजीबाजार झोनमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून पुनर्स्थापना देण्यात आली आहे. आयुक्त हेमंत पवार यांनी तडकाफडकी काढलेल्या या आदेशामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. कार्यालयीन कामाची निकड लक्षात घेऊन ही पुनर्स्थापना झाल्याने प्रशासन कार्यालयीन कामकाजात अडसर निर्माण होऊ नये म्हणून विभागीय चौकशीच्या अधीन राहून का होईना कर्मचाऱ्यांचे हीत जोपासत असल्याचा सुसंदेश यातून गेला आहे. (प्रतिनिधी)महापालिका : कार्यालयीन बेशिस्तीचा आरोप त्यांच्या आशा पल्लवीत सामान्य प्रशासन विभागानुसार आयुक्त हेमंत पवार यांनी मागील ११ महिन्यांच्या काळात सुमारे २३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यापैकी २९ मार्च २०१७ रोजी निलंबित केलेल्या चंद्रकांत देशमुख आणि प्रवीण ठाकरे यांना १५ एप्रिल रोजी महापालिका सेवेत पुनर्स्थापित करण्यात आले. देशमुख अािण ठाकरेंप्रमाणे अन्य निलंबितांवरही कार्यालयीन बेशिस्तीचा ठपका आहे. त्यांनी केलेली वरिष्ठांच्या आदेशाची अवमानना कार्यालयीन शिस्तीविरुद्ध व गंभीर स्वरुपाची आहे, असे असताना देशमुख आणि ठाकरे पंधरवड्यात पुनर्स्थापित झाल्याने अन्य निलंबितांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. असे होते प्रकरण प्रभारी क्रीडाधिकारी प्रवीण ठाकरे यांची वरिष्ठ लिपिक म्हणून, तर चंद्रकांत देशमुख यांची प्र. क्रीडाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. मात्र, बदलीच्या ठिकाणी रुजू न होता प्रवीण ठाकरे वैद्यकीय रजेवर गेले व परतल्यानंतर वरिष्ठ लिपिक म्हणून झोन क्र.५ मध्ये रुजू न होता त्यांनी अवैधरित्या क्रीडाधिकारी पदाची खुर्ची बळकावली तर चंद्रकांत देशमुख यांच्यावरही कार्यालयीन बेशिस्तीचा ठपका ठेवण्यात आला होता. प्रशासनावर राजकीय दबाव ? प्रवीण ठाकरे आणि चंद्रकांत देशमुख यांची प्रशासकीय कारणास्तव पुनर्र्स्थापना केल्याचे आदेश आयुक्तांनी काढलेत.मात्र, काहींनी त्यावर शंका उपस्थित केली आहे. चंद्रकांत देशमुखांना नाहक निलंबित केल्याचे त्यावेळी उघडपणे बोलले गेले. मात्र, प्रवीण ठाकरेंनी मुंबईतील एका ‘गॉडफादर’करवी मनपा प्रशासनावर दबाव आणला. त्याचा परिपाक म्हणून ठाकरे यांना अवघ्या १५ दिवसांत सेवेत रुजू करून घेतल्याची शंका उपस्थित होत आहे.
प्रशासन सुपरफास्ट; पंधरवड्यात निलंबितांची पुनर्स्थापना
By admin | Published: April 21, 2017 12:08 AM