लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद, दहा पंचायत समित्या व महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली व प्रशासकांची नियुक्ती झाली. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे. जिल्ह्यात सध्या २७० ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर पडल्यास प्रशासकाची नियुक्ती होणार का, याबाबतची चर्चा ग्रामीण भागात रंगली आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या २७ जानेवारीच्या आदेशान्वये जिल्ह्यात सध्या २७० ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली व ४ मार्चपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. यावर १५ मार्चला उपविभागीय अधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी घेण्यात येणार आहे. २९ मार्चला जिल्हाधिकारी अंतिम प्रभागरचना जाहीर करणार आहेत. आठवड्यात ज्या पद्धतीने घडामोडी झाल्यात, विधेयक पारित झाले, ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक नाही, ही भूमिका राज्य शासनाने घेतली व महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय आयोगाकडे सुपूर्द करण्यात आलेले निवडणुकीसंदर्भातील काही अधिकार शासनाकडे परत घेतले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील ओबीसी आरक्षणाचा तूर्तास न संपणारा घोळ असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे.
इच्छुकांच्या तयारीवर फेरले पाणीजिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी चांगलीच मोर्चेबांधणी केली होती. या तयारीवर आता पाणी फेरले गेले आहे. ग्रामपंचायतीसाठी आयोग किंवा ग्रामविकास विभागाकडून सध्या तरी काही आदेश नाहीत. मात्र, निवडणूक लांबणीवर पडल्यास गावपातळीवरील इच्छुकांना पुन्हा काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्याजिल्ह्यात जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २७० ग्रामपंचायती आहेत. यामध्ये अमरावती तालुक्यात १३, भातकुली १२, तिवसा १६, अचलपूर २३, चांदूरबाजार २५, दर्यापूर २४, अंजनगाव १३, मोर्शी २४, वरूड २३, चांदूर रेल्वे २८, धामणगाव रेल्वे ७, नांदगाव खंडेश्वर १७, धारणी २६ व चिखलदरा तालुक्यात २९ ग्रामपंचायती आहेत.