अमरावती : पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात निर्णयाधीन आहे. ३० सप्टेंबरपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात परीक्षांची तयारी, विद्यार्थ्यांसोबत संपर्क, मूल्यांकन, निकाल अशी एकुणच कार्यप्रणालीसाठी तीन महिने लागतील. परिणामी नवीन वर्षात १५ जानेवारीनंतरच पदव्युत्तरचे प्रवेश होणार असून, यंदा सहा महिने प्रवेश लांबल्याचे वास्तव आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पदवी अंतिम वर्षाच्या ७० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे. किंबहुना सर्वोच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर रोजी परीक्षांबाबत निकाल जाहीर केला तर, ३० आॅक्टोंबरपर्यंत परीक्षांच्या तयारीसाठी लागणार आहे. विद्यार्थ्यांचे सत्र ३, ४, ५ व ६ बॅकलॉगच्या परीक्षा घ्याव्या लागतील. विद्यापीठाला तब्बल ६६ टक्के परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे. यासाठी किमान ३० नोव्हेंबर उजाळणार आहे. या परीक्षांचे मूल्यांकन व निकाल जाहीर करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत कालावधी लागणार आहे. नवीन वर्षात १५ जानेवारीनंतरच पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया सुरु करता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.
पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षाबाबतचा न्यायालयाचा निर्णय महत्वाचा असेल. पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असा निर्णय विद्यापीठ घेईल. व्हॅकेशन, सिलॅबस कमी करणे हा सुद्धा पर्याय आहे. सकारात्मक निर्णयातून विद्यार्थ्यांना दिलासा दिला जाईल.- एफ.सी. रघुवंशी,अधिष्ठाता, अमरावती विद्यापीठ.