लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा ओढा हा शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश मिळविण्याकडे अधिक आहे. तथापि, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी सिव्हिल, मेकॅनिकलकडे पाठ फिरविली असून आयटी, कॉम्प्युटरकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येते.जिल्ह्यात सात पॉलिटेक्निक संस्था असून यामध्ये दोन शासकीय आहेत. या सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी १८५३ प्रवेशाच्या जागा होत्या. याची प्रवेश प्रक्रिया नुकतीच झाली. यामध्ये १६९४ प्रवेश निश्चित झाले असून १५९ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा या सिव्हिल, मेकॅनिकल अभ्यासक्रमातील अधिक असून याकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ८७२ जागा जिल्ह्यात दोन शासकीय तंत्रनिकेतन आहेत. यामध्ये ८७२ प्रवेशाच्या जागा होत्या. या ठिकाणीही शंभर टक्के प्रवेश होऊ शकले नाहीत. या दोन्ही तंत्रनिकेतनमध्ये ८१६ जागांवरच प्रवेश निश्चित झाले असून ५६ जागा अजूनही रिक्त आहेत.
यंदा डिप्लोमा इंजिनिअरिंगचे ९० टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांचा आयटी, कॉम्प्युटर या विषयाकडे अधिक भर असल्याने या अभ्यासक्रमांच्या जागा या पूर्ण भरल्या गेल्या आहेत. सिव्हिल, मेकॅनिकलकडे मात्र यंदा विद्यार्थी कमी आहेत.- विजय मानकर, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती
खासगी तंत्रनिकेतनच्या ९८१ जागा - जिल्ह्यात खासगी पाच पॉलिटेक्नीक कॉलेज तंत्रनिकेत आहेत. या खासगी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेशासाठी एकूण ९८१ जागा होत्या.यामध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेनंतर ८७८ जागेवरीलच प्रवेश निश्चित झाले आहेत. तर १०३ जागा या रिक्त राहिल्या आहेत.
याकडे विद्यार्थांची पाठ- लवकर नोकरी मिळावी याकरीता पॉलिटेक्निककडे येणाऱ्या विद्यार्थांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात रिक्त राहिलेले प्रवेशाच्या जागा या सिव्हिल व मॅकेनिकल अभ्यासक्रमाच्या आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.
शासकीयमध्ये ५६ तर खासगीत १०३ जागा रिक्तजिल्ह्यात एकूण सात तंत्रनिकेतन आहेत. यामध्ये दोन शासकीय तर पाच खासगी आहेत. या सर्व तंत्रनिकेतनमध्ये एकूण १८५३ प्रवेशित जागा होत्या. परंतु, यामध्ये १५९ प्रवेशाच्या जागा या रिक्त राहिल्या आहेत. शासकीयमध्ये ५६, तर खासगीमध्ये १०३ जागा रिक्त राहिल्या आहेत.
याकडे विद्यार्थ्यांचा ओढाकमी वयात नोकरी मिळावी, याकरिता अनेक विद्यार्थी हे दहावीनंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा करण्यावर भर देतात. तंत्रनिकेतनमध्ये आयटी, कॉम्प्युटर या अभ्यासक्रमांच्या जागा पूर्ण भरल्या आहेत. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचा ओढा या विषयांकडे अधिक होता.