जितेंद्रनाथ महाराज, १७ ला जिल्हा कचेरीसमोर भजन आंदोलन
अमरावती : वारकरी संप्रदायाची साडेसातशे वर्षांची वारीची परंपरा मुगलांच्या साम्राज्यातदेखील खंडित झाली नाही. परंतु, कोरोनामुळे गतवर्षी आषाढी वारी झाली. यंदाही वारकऱ्यांना मज्जाव करण्याची तुघलकी भूमिका घेतली जात आहे. हा अन्याय असून नोंदणीकृत दिंड्यांना पंढरपुरात प्रवेश देण्यात यावा, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता विहिंप, बजरंग दल आणि वारकरी संप्रदायाकडून १७ जुलै रोजी संपूर्ण विदर्भात भजन आंदोलन होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक जितेंद्रनाथ महाराज यांनी पत्रपरिषदेत दिली.
वारी हा वारकरी संप्रदाय व वारकऱ्यांच्या उपासनेचा व महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. शेकडो वर्षांची पायी वारीची ही परंपरा मुगलांच्या तसेच इंग्रजांच्या काळातही अबाधित होती. गतवर्षी कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली. उपासनेकरिता कधीही कोणतीही परवानगी घेण्याची गरज भासली नाही वा धर्मसत्तेने कधीही राजसत्तेकडे तशी परवानगी मागितली नाही. देशात कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता सामान्य होत आहे. हॉटेल, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा, लग्न समारंभ, सरकारी कार्यक्रम सर्रास होत आहेत. त्यात विनामास्क फिरणाऱ्या शेकडोंची गर्दी होत आहे. मग वारकऱ्यांच्या उपासनेच्या मूलभूत अधिकारांवर गदा का आणली जात आहे? महाराष्ट्रात मुबलक लसीकरणाद्वारे कोरोना परिस्थिती नियंत्रणात असताना वारीला विरोध का करण्यात येत आहे? कोरोना संक्रमणाचे सर्व नियम पाळूनही सर्व बंधने शिस्तप्रिय वारकऱ्यांवर का लादली जात आहे, असा सवाल जितेंद्रनाथ महाराजांनी यावेळी केला. १७ जुलै रोजी संपूर्ण विदर्भात भजन आंदोलन करणार आहे. संपूर्ण वारकरी व हिंदू समाज प्रतिवारी निघून विविध मंदिरातून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचतील. तेथे भजन, कीर्तन करून वारीची आठवण म्हणून पांडुरंगाचे झाड लावतील. पुढच्या पिढीला ५०० वर्षांहून अधिक काळातील परंपरा खंडित झाली याची आठवण या वृक्षामुळे व्हावी, हा यामागील उद्देश आहे. आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक जितेंद्रनाथ महाराज, वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्यामबाबा निचत, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सदस्य प्रभूजी महाराज मदनकर, हभप शालिकराम खेडकर महाराज आदी उपस्थित राहतील, असे ते म्हणाले. यावेळी जनार्दनपंत बोथे, विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे, विहिंपचे जिल्हाध्यक्ष अनिल साहू, श्यामबाबा निचत , विहिंपचे महानगर अध्यक्ष दिनेश सिंग उपस्थित होते.
बॉक्स
या आहेत मागण्या
यावर्षी तुकाराम महाराजांचा ३६० वा पालकी सोहळा आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या मानाच्या १० पालख्यांसोबत ५०० लोकांना पायी वारीची परवानगी द्यावी. त्यासोबत दाखल होणाऱ्या ३५० ते ४०० पालख्यांसोबत किमान तीन ते चार लोकांना वारी करू द्यावी. संक्रमणाचा धोका वाटल्यास वारकरी माळरानात मुक्काम करतील, पण लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेल्यांना नियम पाळून प्रवासाची परवानगी द्यावी.
-