अमरावती : राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री तथा पालकमंत्री म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळल्यानंतर गुरुवारी मुंबईतील मंत्रालयीन कार्यालयातील सहकाऱ्यांचा निरोप घेताना ॲड. यशोमती ठाकूर यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार केला. स्वत: औक्षण करत, शाल पांघरत प्रधान सचिव, खासगी सचिव, विशेष अधिकारी, पोलीस स्टाफ यांच्यापासून शिपाई, स्वयंपाकी, सुरक्षारक्षक यांचा सत्कार केला.
अतिशय भावपूर्ण वातावरण झाले असताना ॲड. ठाकूर म्हणाल्या की, आपण सर्वांनी गेली अडीच वर्षे दिलेली साथ मोलाची आहे. आपण सर्वांनीच सामान्यांना दिलासा देणारे निर्णय केले, जनतेच्या भल्याची कामे केली. आता अधिकारी, कर्मचारी असे नाते राहिले नाही तरी आपले ऋणानुबंध आयुष्यभराचे राहणार आहेत. मी कायम तुमच्या सोबत असेन, असेही ॲड. यशोमती ठाकूर यांनी आश्वस्त केले. तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.