अमरावती : रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम सगळीकडेच झाला, तसा तो सोने-चांदीवरसुद्धा झाला. मात्र, हौसेला मोल नसल्याने त्याची खरेदी कमी झालेली नाही. लग्नप्रसंगी सोन्याचा दागिना करावाच लागतो म्हणून गरिबातला गरीबसुद्धा सोन्याच्या दुकानात जातोच. यासोबतच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा मुहूर्त ओळखून थाेडे का होईना, सोने खरेदी केले जाते.
सोने ५२ हजारांवर
सध्या बाजारात साेन्याचा दर ५२ हजार रुपये प्रतितोळा आहे. गतवर्षाच्या तुलनेत सोन्याचा दर वाढलेला आहे. असे असूनही सोने व चांदी खरेदी ग्राहकांकडून कमी झालेली नाही. युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर झाला आहे.
चांदी ६८ हजारांवर
६४ हजार रुपये प्रतिकिलो असलेली चांदी आता ६८ हजार रुपये किलोवर पोहोचली आहे. एकदा वापरलेली चांदी मोड म्हणून पुन्हा वापरास येत नाही. यातून चांदीचा दर वेगाने वाढताना पाहायला मिळत आहे.
साेने वर्षभरात चार हजारांनी वाढले
दरवाढीचा फटका लग्नप्रसंगाला बसला आहे. मात्र, असे असले तरी आवश्यक दागिने खरेदी केलेच जातात. ४८ हजार रुपये तोळा असलेले साेने ५२ हजार रुपये तोळ्यावर पोहोचले. सोने एवढे वाढेल, असा विचार कोणी केला नव्हता.
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम सोने-चांदी दरवाढीवर झाला. मात्र, ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम झाला नाही. लग्नसराईमुळे मागणी सध्या वाढली आहे. अक्षय तृतीयेकरिता ग्राहकांकडून आगाऊ बुकिंग आहे.
- समीर कुबडे ( सराफा व्यावसायिक )
महाग झाले म्हणून काय झाले?
सध्या सराफा बाजारात सोने महाग झाले असले तरी घरी आता लग्न असल्याने सोन्याचे दागिने करावेच लागणार आहेत. नवीन मुलीला घरी आणायचे असल्याने साेने घ्यावेच लागणार आहे.
- आरती शरद राऊत
मागील वर्षी सोने एवढे महाग नव्हते. यावर्षी जरा जास्तच दरवाढ झाली आहे. अक्षय तृतीयेला सोने घ्यायचा मान असल्याने यावर्षी मुहूर्तावर थोडेच सोने खरेदी करू.
- अर्चना नरेंद्र हरणे