अमरावती : ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड असल्याने उत्पन्नात ५० टक्क्यांवर घट येणार म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ४१ महसूल मंडळांसाठी अधिसूचना जाहीर केली. अन् आठ दिवसांत जिल्हाभरातील सर्वच म्हणजे १९९० गावांतील नजर अंदाज ६०.२९ पैसेवारी गुरुवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बाधित खरीप पिकांकडे ‘नजरअंदाज’ करण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
यंदा पेरणीपासून संकटाचे शुक्लकाष्ट शेतकऱ्यांच्या मागे लागले आहे. मान्सूनला तीन आठवडे विलंब लागल्याने खरीप पेरण्या उशिराने झाल्या. त्यातच जुलैमध्ये संततधार पाऊस व ४२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याने ८० हजार हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचा खुद्द महसूल विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. यानंतर ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड राहिल्याने वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या पिकांची वाढ खुंटली व कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात कमी येणार आहे. या पार्श्वभूमीवर नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील पिकांचे वास्तववादी चित्रण नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तालुकानिहाय गावे, जाहीर नजरअंदाज पैसेवारीअमरावती तालुका १४३ गावे (नजरअंदाज पैसेवारी ५७), भातकुली १४२ (६४), तिवसा ९९ (५५), चांदूर रेल्वे ९१ (५७), धामणगाव ११५ (६३), नांदगाव खंडेश्वर १६१ (६८), मोर्शी १५९ (६२), वरुड १४२ (६४), अचलपूर १८६ (५७), चांदूरबाजार १७१ (५५), दर्यापूर १५६ (६०), अंजनगाव सुर्जी १२८ (६०), धारणी १५२ (५९) व चिखलदरा तालुक्यात १४५ गावांत ५५ नजरअंदाज पैसेवारी आहे.