लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गर्ल्स हायस्कूलच्या आवारात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याच्या मुद्द्यावरून प्रशासकीय अधिकारी व लोकशाहिरांच्या अनुयायांमध्ये शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी अण्णाभाऊंच्या अनुयायांनी घेतलेल्या ठरावाच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, असे आश्वासन दिले.जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उच्च न्यायालयाला पाठविल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्राची प्रत मिळेपर्यंत लोकशाहिरांच्या अनुयायांचे धरणे सुरू राहील, असा पवित्रा घेतला. शुक्रवारी दुपारी लहुजी शक्ती सेना, भीम आर्मी व भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकाºयांनी जिल्हा कचेरीवर पुन्हा धडक दिली. पुतळा बसविण्याचा मुद्द्यावरून अनुयायांनी छेडलेले आंदोलन लक्षात घेता, जिल्हाधिकारी बांगर यांनी पोलीस आयुक्तांना चर्चेसाठी बोलावून घेतले. यादरम्यान अनुयायांनी जिल्हाधिकाºयांच्या कक्षासमोर ठिय्या मांडला होता. काही वेळातच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, उपायुक्त चिन्मय पंडित, गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे व अन्य प्रशासकीय अधिकारी पोहोचले. अगोदर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर लोकशाहीर यांचे अनुयायी चर्चेकरिता जिल्हाधिकारी यांच्या दालनात गेले. अनुयायांनी आपली बाजू मजबूत असल्याचे सांगून अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यावर जोर दिला. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे सद्य:स्थितीत पुतळा बसविता येणार नसल्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. अण्णाभाऊ साठे व राणी दुर्गावती असे दोन्ही पुतळे आम्ही बसवू, सर्व प्रक्रिया पूर्ण करू, कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेऊ, असा ठराव अनुयायांनी वकिलामार्फत जिल्हाधिकाऱ्यांपुढे ठेवला. ठरावाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले. गर्ल्स हायस्कूल चौकात १ आॅगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पूजनाचा कार्यक्रम घेऊ, तो कार्यक्रम शांततेत पार पाडू, अशी ग्वाहीही लोकशाहीर यांच्या अनुयायांनी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना दिली.उपायुक्त आले बाइकवरजिल्हाधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीला उपायुक्त चिन्मय पंडित हे सहकाऱ्याच्या दुचाकीने पोहोचले. त्यानंतर विसेक मिनिटांनी त्यांचे शासकीय वाहन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले. वडिलांना सोडण्यासाठी वाहन बडनेरा रेल्वे स्टेशनला गेले होते. ट्रेन ऐनवेळी लेट झाल्यामुळे परतण्यास उशीर झाला, अशी माहिती डीसीपींच्या वाहनचालकाने 'लोकमत'ला दिली.'वैयक्तिक घेऊ नका'जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करताना मुद्दा वैयक्तिक घेऊ नका, अशी सूचना ठाणेदार मनीष ठाकरे यांनी लहुजी सेनेचे विदर्भाध्यक्ष रूपेश खडसे यांना केली. ठाकरे यांच्या निलंबनाची मागणी खडसे यांनीच ताकदीने रेटून धरली होती.
जिल्हाधिकारी उच्च न्यायालयाला पाठविणार प्रतिज्ञापत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:58 PM
गर्ल्स हायस्कूलच्या आवारात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याच्या मुद्द्यावरून प्रशासकीय अधिकारी व लोकशाहिरांच्या अनुयायांमध्ये शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकारात्मक चर्चा झाली.
ठळक मुद्देअण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसविण्याचा मुद्दा : कृती समितीचे आंदोलन सुरूच