वरूड : वरूड तालुका शेतकी खरेदी विक्री समितीचे तालुक्यातील वाठोडा येथे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातून शेती साहित्य, बियाणे, कीटकनाशके, खते शेतकऱ्यांना माफक दरात विक्री केली जातात. येथील लिपिकाने स्वतःच्या फायद्यासाठी विक्री केलेल्या मालाच्या चुकीच्या नोंदी रजिस्टरवर घेऊन ३ लाख ४० हजार १८ रुपयांचा अपहार केल्याचे वार्षिक लेखापरीक्षण अहवालात आढळून आले. त्यात्याविरूद्ध अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या उपकेंद्रात कार्यरत लिपिक रवींद्र केशवराव ठाकरे (रा. सुरळी) याने विक्री केलेल्या मालाच्या नोंदी चुकीच्या घेऊन वरूड तालुका शेतकी खरेदी-विक्री समितीच्या मुख्य कार्यालयाची दिशाभूल केली. रासायनिक खताच्या विक्री पावतीच्या रकमेचा भरणा केला नाही. विक्री पावतीपेक्षा कमी रकमेचा भरणा करून अपहार केल्याचे वार्षिक लेखा परीक्षण अहवालात स्पष्ट झाले. ३ लाख ४० हजार १८ रुपयांची अफरातफरी केल्याचे निष्पन्न झाले. यावरून लेखा परीक्षक विलास कोकाटे (रा. अमरावती) यांनी वरूड पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी लिपिक रवींद्र ठाकरेविरुद्ध भादंविचे कलम ४०६, ४०८, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर यांचे मार्गदर्शनात एपीआय सुनील पाटील करीत आहे.