अमरावती : अचलपूर तालुक्यातील मौजा फरमानपूर येथील मृत वराहाच्या घेण्यात आलेल्या नमुन्यात आफ्रिकन स्वाइन फिव्हर आढळून आलेला आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मौजा फरमानपूर या भागाचे एक किमी परिघातील क्षेत्रास बाधितक्षेत्र व दहा किमी परिघातील क्षेत्रास संनियंत्रण क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शुक्रवारी आदेशित केले आहे.
बाधित क्षेत्राच्या एक किमी परिसरातील सर्व वराहांचे कलिंग करून त्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावून त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करावे. आफ्रिकन स्वाइन फिव्हर या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित परिसरातील सक्रिय संनिरीक्षण व्यापक प्रमाणावर करावे व सुयोग्य जैवसुरक्षा उपाययोजना कराव्यात. पाळीव तसेच जंगली वराहातील अनियमित वर्तणुकीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याशिवाय वराहाच्या मांसाची विक्री करणाऱ्या आस्थापनांची नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्या आस्थापनांना स्थानिक पशुवैद्यकीयांनी नियमित भेटी देऊन नियंत्रण ठेवावे, तसेच वराहपालन करणाऱ्या सर्व आस्थापनांनी स्वच्छता व जैव सुरक्षा उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.